Saturday, July 2, 2016

Sakharpuda

 Sakharpuda Ukhana

खूप दिवसांपासून ऑनलाइन नाही आहात ?

मग ऐका हा उखाणा...खास तुमच्यासाठी

गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा पुडा

गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा पुडा

मेसेज नाही , ऑनलाइन नाही

ठरलाय का साखरपुडा ?

आगरी-कोळ्यांच्या हळदी, लग्न, वरातीबरोबरच साखरपुड्यालाही हजारएक पाहुणे जाऊन त्यांच्यावर भरमसाठ खर्च करण्याचा नवाच प्रकार सुरू झाला आहे. त्याविरुद्ध जागरूक समाजबांधवांनी धोक्‍याची घंटा वाजविली आहे. नवी मुंबईतील "फोर्टी प्लस मास्टर क्‍लब‘ या क्रीडा संघटनेचे सदस्य साखरपुड्यातली उधळपट्टी थांबविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

मराठा असो की माळी, आगरी असो की कोळी... राष्ट्रसंत गाडगेबाबांनी दाखविलेला कल्याणमार्ग सोडून महाराष्ट्रातील अनेक समाजांमध्ये लग्नसमारंभातील उधळपट्टीचे लोण चिंता करावी इतपत वाढले आहे. भपकेबाजीच्या हव्यासाने रसातळाला जाणारा समाज पाहून काही वर्षांपूर्वी दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांनी सावधगिरीची हाक दिली होती. आगरी-कोळ्यांच्या हळदी समारंभावर होणारा भरमसाठ खर्च आणि ओल्या पार्ट्या पाहून हळदी समारंभ बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याला समाजाचा चांगला प्रतिसादही मिळाला; पण काळाच्या ओघात विवेकाचा हा धागा क्षीण झाला आहे.

"फोर्टी प्लस‘ ही चाळिशी ओलांडलेल्या तरुणांची क्रिकेट संघटना आहे. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत साखरपुड्यावर होणारा अवास्तव खर्च रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. क्‍लबचे सदस्य प्रबोधनाची मोहीम हाती घेणार आहेत. माजी नगरसेवक जी. एस. पाटील, बाळाराम पाटील, नगरसेवक चंद्रकांत पाटील, पत्रकार राजेंद्र घरत, संजय सुर्वे, लेखक पर्यावरण मित्र गजानन म्हात्रे यांसह फोर्टी प्लसचे सभासद बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. साखरपुड्यासाठी पूर्वी केवळ 10 ते 15 लोक जात असत. आता हजार लोक येतात. हे थांबविण्याची गरज आहे, असे जी. एस. पाटील म्हणाले. पैशांचा अपव्यय थांबवून तो मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा, असे आवाहन घरत यांनी केले. सर्व सदस्यांनी आपल्या मुलांचा साखरपुडा साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला.

खर्च करण्याची स्पर्धा
-आगरी, कोळ्यांची लग्ने म्हणजे मोठा उत्सव. कोण किती खर्च करतो याची एक स्पर्धाच. पूर्वी हळदीला खर्च करण्याचा कल असायचा. आता लग्नाआधी साखरपुड्यात खर्च करण्याची स्पर्धा लागली आहे.

-पूर्वी ओल्या पार्ट्या हळदीलाच झडत. आता साखरपुड्यातही त्या होऊ लागल्या आहेत. पूर्वी साखरपुड्याला केवळ घरातली मंडळील मोजके नातेवाईक जात. साधे मटण-भाकरीचे जेवण असे. जास्तीत जास्त तीनशे लोक येत.

-सध्या साखरपुड्याला सातशे ते हजार लोक येऊ लागले आहेत. हा खर्च मुलीकडच्यांना करावा लागतो. मटण-भाकरीबरोबर चायनीज मेनू वाढू लागले आहेत.

-पूर्वी 60 ते 70 हजारांत होणारा साखरपुडा दोन ते तीन लाखांत पडू लागला आहे. श्रीमंतांना हे सोसवत असले तरी गरीब, मध्यमवर्गीयांना भुर्दंड पडू लागला आहे.

-पूर्वीपासून मुलीकडून हुंडा न घेणारा समाज, अशी आगरी-कोळ्यांची ओळख. त्यामुळे आधुनिक काळात सधनता वाढत असताना अनाठायी, वाईट रूढी कशाला तयार करायच्या, असा प्रश्‍न सुजाण समाजबांधव विचारीत आहेत.

===================

ग्न...दोन तनांच्या-दोन मनांच्या मीलनाचा आनंददायी सोहळा...हुरहुरीचा, चुटपुटीचा, उत्साहाचा, धावपळीचा, गडबड-घाईचा आणि वेगवेगळ्या गमतीजमती घडण्याचाही हा दिवस...उत्सवमूर्तींच्या मनात अशा कितीतरी आठवणी रुंजी घालत असतात...महिने उलटतात, वर्षं सरतात...पण या आठवणींचा रंग, गंध जसाच्या तसा राहतो...अशाच रंगीत, गंधित आठवणी पाठवण्याचं आवाहन वाचकांना केलं आणि नेहमीप्रमाणंच भरपूर प्रतिसाद मिळाला..."लग्नाच्या दिवसा'च्या अशाच आठवणींचा हा "बुके' दर आठवड्याला...
==========================================
नवरदेवानं केलं आधी चोरांना "चतुर्भुज'!
शीतल महाडिक, पुणे
माझं आणि परागचं लग्न 5 जुलै 2003 ला झालं. साखरपुडा आदल्या दिवशी होता. सर्व विधी झाल्यावर एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम होता. परागनं माझ्या बोटात अंगठी घातली. नंतर मी त्याच्या बोटात अंगठी घालायला गेले तर ती त्याच्या बोटात जाईनाच. मी गोंधळून गेले. काय करावं, ते कळेना. मी हात मागं घेतला. परागच्या बोटात मी अंगठी घातली, असं सगळ्यांना वाटलं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या; पण अंगठी परागच्या बोटात गेली नसल्याचं मी हात वर करून, अंगठी दाखवत सगळ्यांना सांगितलं. सर्वजण मनसोक्त हसले. शेवटी, मोठ्या प्रयत्नानं तीच अंगठी मी परागच्या बोटात कशीबशी घातली. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवल्या!

साखरपुडा संपल्यावर पराग घरी जायला निघाला; कारण त्याचं म्हणणं, त्याला कार्यालयात झोप आली नसती.

लग्नाचा दिवस उजाडला. हळदीची तयारी झाली. मी तयार होऊन बसले; पण परागचा अजून पत्ताच नव्हता. सगळेजण धास्तावले. फोनवर फोन सुरू झाले. नंतर कळलं ते असं ः साखरपुडा संपवून पराग घरी गेला असता त्यांच्या कॉलनीत चोर आलेले होते व त्यांना पकडून पोलिस ठाण्यात नेण्याचं काम पराग आणि त्याच्या काकांनी केलं होतं. या सगळ्या गडबडीत त्याला झोपायला उशीर झाला होता. अर्थात हळदीच्या कार्यक्रमाला उशीर झाला असला तरी तो यथासांग पार पडला.

लग्नाच्या वेळी आम्हा दोघांच्या मध्ये आंतरपाट एवढा खाली धरला गेला होता, की आम्ही दोघंही एकमेकांना सहज पाहू शकत होतो. माझे सासरे सारखे सांगत होते, "अरे आंतरपाट वरती धरा...' पण मंगलाष्टकांमुळं गुरुजींचं तिकडं लक्षच गेलं नाही. गुरुजी मंगलाष्टकंही गमतीशीर आवाजात म्हणत होते. ते ऐकूनही आम्हाला हसू फुटत होतं!
-----------------------------------------------------------------------
तासा-दीड तासात आटोपलं लग्न
सुनीलकुमार सिंह जेऊर (सोलापूर)
मूळचा उत्तर प्रदेशातला; पण गेली 25 वर्षं नोकरीनिमित्त महाराष्ट्रातच आहे. उत्तर प्रदेशात लग्नाचा मुहूर्त रात्रीच्या वेळी असतो... लग्नसमारंभही प्रदीर्घ वेळ चालतो...कितीतरी दिवस चालतो! मात्र, मला हे सगळं टाळायचं होतं आणि मला लग्नासाठी रात्रीचीही वेळ नको होती...दिवसाच लग्न करायचं, असं मी ठरवलं होतं.

मुलगी पाहण्यासाठी आम्ही मध्य प्रदेशात गेलो. मुलीच्या घरी पोचलो. "मुलगी दाखवा' असं मी त्यांना पोचल्या-पोचल्याच सांगितलं. (कारण, घरगुती रूपात ती कशी दिसते, हे मला पाहायचं होतं. सासरीही ती घरगुती रूपातच वावरणार होती ना!). मुलगीही लगेचच आली. पंजाबी ड्रेस...आणि एका हाताला बेसन पीठ लागलेलं...(ती त्या वेळी ब्रेड रोल करत होती). मुलीला मी पसंत पडलो आणि तीही मला आवडली. लग्न ठरलं. लग्न अगदी साध्या पद्धतीनं करायचं आहे, असं मी मुलीकडच्यांना सांगितलं आणि तशी त्यांची संमती घेतली. दोन्हीकडचे मिळून 30-40 जणच लग्नाला उपस्थित होते आणि अगदी तासा-दीड तासांत आमचा लग्नसमारंभ पार पडला. परतीचा प्रवास सुरू झाला. मी आणि पत्नी ज्या गाडीत होतो, ती गाडी माझा धाकटा भाऊ चालवत होता. प्रवासाच्या सुरवातीलाच आमच्या गाडीला मांजर आडवं गेलं. त्यामुळं भावानं गाडी थांबवली. त्याला वाटलं, अपशकून झाला. "मांजर आडवं जाणं म्हणजे अपशकून, ही अंधश्रद्धा आहे. आज मी एका नव्या आयुष्याला सुरवात करत आहे. काही नुकसान व्हायचंच असेल तर ते माझं होईल, ' हे मी भावाला समजून सांगितलं. आमचा तो प्रवास सुखरूप झाला...आता माझ्या लग्नाला 15 वर्षं झाली आहेत. या प्रदीर्घ काळात छोट्या-मोठ्या गोष्टीमुळं कधीही नाराजी किंवा भांडण झालेलं नाही... सुंदर, समजूतदार, प्रेमळ बायको नि दोन गोंडस, समंजस मुलं यांच्या सहवासात मी आनंदात आहे!
-----------------------------------------------------------------------
आधी "रावणवध'; मग "विद्यास्वयंवर'!
विद्या वाळिंबे, सोलापूर
आमच्या वैवाहिक आयुष्यानं नुकतंच (5 जून 1988) पंचविशीत पदार्पण केलं आहे. तो काळ दूरदर्शनवरच्या "रामायण' या मालिकेनं भारलेला-मंतरलेला होता. साहजिकच माझ्या लग्नसोहळ्यातही या मालिकेचे पडसाद उमटलेच. मोठी शहरं, छोटी शहरं, खेडी, गावं...अशा सर्वच ठिकाणं त्या काळी रविवारी "रामायणमय' होऊन जायची. माझं लग्न सोलापुरात होतं. दिवस रविवारचाच. मुहूर्त 10 वाजून 32 मिनिटांचा...रामायण मालिकाही याच वेळेच्या आसपास असायची. (आणि त्या दिवशी होता नेमका "रावणवधा'चा सीन!).

साहजिकच, लग्नमंडपातील बहुतेक मंडळी टीव्हीच्या शोधार्थ बाहेर पडली...कुणी स्वतःच्या घरी, कुणी ओळखीच्या घरी, कुणी हॉटेलात, कुणी दुकानांत, कुणी चहाच्या टपरीवर..एवढंच काय, "आलोच आत्ता' असं म्हणत गुरुजीही "रावणवध' पाहण्यासाठी मंडपातून बाहेर पडले. मालिकेचा तो अर्धा तास लग्नमंडपात आम्ही वधू-वर आणि काही मोजकेच नातेवाईक होतो! मुहूर्ताची वेळ जवळ येत चालली, तरी मंडपात अगदी तुरळकच माणसं...त्यामुळं मला, माझ्या आई-वडिलांना खूपच काळजी वाटू लागली. अखेर, "रावणवध' आटोपून गुरुजी धोतराचा सोगा आवरत मंडपात लगबगीनं दाखल झाले....अन्य मंडळीही मागोमाग आली...नि जेमतेम मुहूर्तावर हे "विद्यास्वयंवर' पार पडलं!
-----------------------------------------------------------------------
मावशी, दादा-वहिनी तिथं स्टेजवर आहेत!
ज्योत्स्ना शिंपी, पुणे
माझ्या आणि दीपक ऊर्फ निरंजनच्या लग्नाचा सोळावा वाढदिवस (2 जून 1996) नुकताच झाला.
लग्नाच्या दिवशी झालेला गमतीशीर प्रसंग आजही आठवतो...लग्नानंतर आम्ही दोघं "रिसेप्शन'साठी स्टेजवर उभे राहिलो; तर माझा धाकटा दीर अपूर्व हॉलमध्ये फिरत होता. माझ्या सासूबाईंच्या काही मैत्रिणी आल्या. त्यांनी अपूर्वच्या हातात प्रेझेंट दिलं व "दीपक, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा; तुझी अर्धांगिनी कुठं आहे, ओळख तरी करून दे' असं अपूर्वलाच त्यांनी म्हटलं. तो गोंधळून गेला. म्हणाला, "मावशी, दादा-वहिनी तिथं स्टेजवर आहेत; मी अपूर्व आहे. दीपकचा भाऊ.' सासूबाईंच्या मैत्रिणी चांगल्याच ओशाळल्या. खरंतर दीपक आणि अपूर्व यांच्यात चांगलं नऊ वर्षांचं अंतर आहे. मला तर ते दोघं अजिबात एकसारखे वाटत नाहीत; पण बरेच परिचित म्हणतात, की दोघांत खूपच साम्य आहे. शिवाय, लग्नानिमित्त दोघांचेही सारखे सूट, दीपकसारख्याच अपूर्वच्याही मिश्‍या..त्यामुळे हा गोंधळ झाला असावा कदाचित!
आमच्या लग्नानंतर अपूर्वनं मिशी राखणं सोडूनच दिलं...म्हणाला, "पुन्हा गोंधळ व्हायला नको'!
============================

आजच्या मुलींचं नेमकं चाललंय काय? लग्न होणाऱ्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा, घरकामांबद्दलची नावड असं काहीही असलं, तरी त्यावर मोकळेपणानं बोलायला हवं.
आजची तरुणी उच्चशिक्षित, कमावती, महत्त्वाकांक्षी अन्‌ स्मार्ट आहे. पण लग्नाच्या मुद्‌द्‌यावर काहीतरी बिनसतंय. यावरून नेत्राची गोष्ट ऐकण्यासारखी आहे.

नेत्रा एमबीए असून चांगल्या आयटी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करते. 29 वर्षांच्या नेत्राचं व तिच्या आई-वडिलांचं तिच्यासाठी वरसंशोधन सुरू आहे चार वर्षांपासून. दोन वर्षांपूर्वी तिचा एकदा साखरपुडा झाला, त्यानंतर विवाह तिनेच मोडला. आई-वडिलांनी तिच्या कलाने घेतले. "जबरदस्ती नको, होऊ दे तिच्या मनानं‘ म्हणून जड अंतःकरणानं लग्न मोडलं.
आता तीन महिन्यांपूर्वी एका उपवर मुलाशी लग्न जुळलंय. त्या निर्णयापर्यंत यायला ती त्याला तीन महिन्यांत अनेक वेळा भेटली. घरचेही भेटले. लग्न ठरल्याचं व साखरपुड्याची तारीख दोन्ही कुटुंबांनी मिळून ठरवली आणि पुन्हा नेत्राचं येरे माझ्या मागल्या. या मुलात पण बरेच दोष काढून लग्न मोडायचं म्हणून हटून बसली आहे. त्यानंतर आई-वडील समुपदेशनाला घेऊन आले.
अनामिकाची गोष्ट त्याहून वेगळी. तिचं वैभवशी, बघून- पसंत करून व्यवस्थित लग्न झालं. दोन्हीकडचे सर्व खूष. कारण हे दोघेही उच्चशिक्षित. आयटीत नोकरीला, दिसायला अनुरूप. पण अनामिका आपल्या लग्नापूर्वीच्या बॉय फ्रेंडला लग्नानंतर काही दिवसांतच नियमित भेटू लागली. गोष्टी बऱ्याच थरापर्यंत गेल्यावर, तिच्या नवऱ्याला, वैभवला कळलं. मग त्यांनी त्या दोघांना पकडलं. हे सर्व लग्नाला महिना व्हायच्या आत झालं. त्यानंतर हताश झालेला वैभव समुपदेशनाला आला.
हे काय चाललंय आजच्या मुलींचं? इतका गोंधळ का बरं चालला आहे? आई-वडील संस्कार करतात, पण पुढचा स्वतःचा विकास स्वतःला करावा लागतो, त्यावरून त्यांना कुठे थांबावं हे कळत नाही का? समजा लग्न होणाऱ्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा, घरकामांबद्दलची नावड असं काहीही असलं, तरी त्यावर मोकळेपणानं बोलायला हवं. साधारणपणे आजचे पालक सर्व समजून घेतात, मार्ग सुचवतात, उपायांवर चर्चा करतात. समुदपेशकाकडेही नेतात. पण मुळात आपल्याला आपला प्रश्‍न काय आहे ते कळतं का? मुली स्वतः स्वतःचं आयुष्य का कठीण करतात? मी नोकरी करते, पैसे कमावते म्हणून मला सर्व समजले, असे वाटणाऱ्या मुली घरात आई-वडील आजारी पडल्यास बऱ्याचदा व्यवस्थित स्वयंपाक करून त्यांना जेवू घालू शकत नाहीत. नेत्राच्या बाबतीतही तिचे वडील तिला म्हणाले, ""तुला हे लग्न करायचं नाही, तर मी ते स्वीकारतो; पण या पुढं तू वेगळं घर घेऊन रहा. त्यानंतर लग्न कर वा नको करू, तुझं आयुष्य तूच बघ. कारण आम्हाला आता मानसिक त्रास सहन होत नाही...‘‘ पण नेत्रात स्वतंत्र राहण्याचा आत्मविश्‍वास वा धमक मुळीच दिसली नाही. म्हणजे पैसे मिळवण्यापलीकडे माझ्यातले गुण-अवगुण मला माहीत नाहीत आणि मी दुसऱ्याचे गुण-अवगुण बघून त्याला पास-नापास करतेय.
त्यामुळे स्वतःला लग्नासाठी तयार करण्याकरिता स्वतःचे गुण-दोष, मी कोण आहे, माझ्या आवडी-निवडी, मी कुठल्या मुद्‌द्‌यांवर जुळवून घेऊ शकते, कौटुंबिक पार्श्‍वभूमी आदी विविध मुद्दे मला माहीत करून घ्यायला हवेत, त्यानंतरच आपण लग्नाला तयार करू शकतो आणि जोडीदाराच्या अपेक्षांबद्दल विचार करू शकतो.
==================
तनिष्काच्या वाचकांच्या आठवणी, अनुभव दृश्‍य स्वरूपात दाखवणारं हे सदर. वाचकांचेच फोटो आणि वाचकांच्याच आठवणी...
लग्नाच्या दागिन्यांच्या आठवणी. प्रत्येकाच्या मनातला हळुवार कोपरा. तनिष्काच्या वाचकांनी शेअर केला आहे खास आपल्या सर्वांसाठी...


माझ्या लग्नातला दागिना

कंबरपट्ट्याची हौस
आत्याकडे एक कंबरपट्टा होता. आजीने पिढीजात कंबरपट्टा आत्त्याला दिलेला. त्यावरून आई नाराज होती. तिने हट्टाने माझ्या लग्नात माझ्यासाठी छानसा कंबरपट्टा केला आणि स्व:ताच्या मनाचं समाधान करून घेतलं.
-रमा पांडे, औरंगाबाद

माझी गुपचूप हौस
आमचं लव्ह मॅरेज. माहेरून मला काही दागिने घालणं शक्‍य नव्हतं. सासरचीही तशीच स्थिती. मी पगारातले पैसे साठवून तोडे घेतले. लग्नात नवऱ्याने मला दिले. घरात आधी सांगितलं असतं तर ते पैसे लग्नखर्चासाठी द्यावे लागले असते.
-वैशाली कापसे, नाशिक

पिढीजात दागिना
माझ्या सासूबाईंनी मला लग्नात एक मोहनमाळ दिली. सासूबाईंना त्यांच्या लग्नात ती त्यांच्या सासूकडून मिळाली होती. प्रत्येक पिढीत आम्ही त्याचा एक पदर वाढवतो. घरचा दागिना म्हणून खूप कौतुक वाटतं..
सुधा कुलकर्णी, सोलापूर

आवड जाणली
सासूबाईंकडे एक वाकी होती. मी लग्नाआधी सणाला किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने सासरी जायचे, तेव्हा सासूबाईंच्या दंडात ती वाकी दिसायची. मला आवडली होती. लग्नात सासूबाईंनी लक्षात ठेवून सासरचा दागिना म्हणून ती वाकी मला दिली.
अनिता पाटील, नगर

आजीचा ठेवा
माझी आजी प्रेमळ पण करारी. माझ्या लग्नाआधी आजीने तिचे दागिने दिले आणि नवीन फॅशनप्रमाणे माझ्यासाठी करायला सांगितले. एक तर आजीने स्वत:चे दागिने देणं याचं आश्‍चर्य होतं आणि त्यात तिने नव्या फॅशनचे करायला सांगावेत हे आणखीनच आश्‍चर्य!
वसुंधरा काशीकर, पुणे

मामीची भेट
माझ्या माहेरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे लग्नात आई-बाबा मला दागिने घालू शकणार नव्हते. माझी मामी अमेरिकेहून आली. येताना ती माझ्यासाठी गळ्यातले-कानातले असा सेट घेऊन आली होती. मामीने अचानक दिलेली ती भेट खूपच आनंददायी ठरली.
- ज्योत्स्ना राजे, औरंगाबाद

अंगठीची मजा
माझा साखरपुडा होता. त्यासाठी आम्ही दोघांनी एकसारखी अंगठी करायला दिली होती-तीही माझ्या माहेरच्या गावी. माझा नवरा अंगठी घेऊन त्याच्या गावी जाताना त्याच्याकडून अंगठी हरवली. घरी सांगितलं तर गोंधळ होणार. त्याने ती गोष्ट फक्त मला सांगितली. तो परत गावी आला. नवी अंगठी तयार करायला दिली. या गोंधळात साखरपुड्याच्या दिवशी अंगठी मिळालीच नाही. पुढे लग्नात नवऱ्याकडून मला ती अंगठी मिळाली.
राजश्री चव्हाण, कोल्हापूर 

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...