मुस्लिमांची कोंडी आणि धार्मिक प्रतिक्रिया
हिंदू-मुस्लिम संमिश्र संस्कृतीचा नाश कोणत्या कारणांनी झाला, ते सांगणारं हुमायून मुरसल यांचं 'बाबरी ते कणेरी' या पुस्तकाचं प्रकाशन आज पुण्यात होत आहे. राजकारणामुळे मुस्लिमांची कोंडी होऊन ते धार्मिकतेकडे कसे वळले, ते सांगणाऱ्या प्रकरणातील हा संक्षिप्त अंश
धर्मांतरित मुस्लिम जातींना जातिव्यवस्थेत तळाकडे स्थान होते, या कारणाने मुस्लिम समाज जमीन व इतर संपत्तीवर हक्क नसलेला साधनहीन, वंचित आणि मागासलेला राहिला. स्वातंत्र्यानंतर सरकारने त्याच्या या परिस्थितीचा विचार केला नाही. योग्य कायदेशीर तरतुदी करून, योग्य धोरण आखून त्याच्या जीवनात बदल येईल असे हक्क त्याला दिले नाहीत आणि विकास योजना आखल्या नाहीत. परिणामी, तो शिक्षण, विकास आणि सत्तेच्या परिघातून हद्दपार झाला. असुरक्षिततेने त्याला घेरले. या परिस्थितीला बदलणारी, मुस्लिमांना आधार देणारी विवेकवादी सामाजिक-राजकीय चळवळ अस्तित्वात नव्हती/नाही. अशी चळवळ उभारण्याचे प्रयत्न दुर्दैवाने झाले नाहीत. उलट, कुरआन, हदिस, इस्लामिक कायदापद्धती अशा ग्रंथबद्ध संहितांवर आधारित जीवनपद्धती आणि धर्माचरणाच्या आग्रहामुळे मुस्लिम समाजात शतकांपासून इस्लामिक आयडेंटिटी रुजलेली आहे. या कार्यासाठी समाजात आवश्यक संस्था आणि संघटना, ग्रंथसंपदा, धार्मिक विचारवंत हाताशी आहेत. (उदा. मदरसे, मशीद, दर्गे इ; पूर्णवेळ पगारी धर्मगुरू, आयडिऑलॉजी देणारी ग्रंथसंपदा, प्रवक्ते, पायाभूत सुविधा, स्वीकारार्ह मानसिकता, सर्व काही ऐतिहासिक वारसा म्हणून सहज हाताशी उपलब्ध आहे.) याचा फायदा घेऊन मुस्लिम धुरिणांनी प्रतिक्रियास्वरूप धार्मिक आयडेंटिटी पक्की करणारी चळवळ बांधली. आधुनिक शिक्षण, आधुनिक विचारांचा जनतेला स्पर्श नव्हता. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांविना धार्मिक पुनरुज्जीवनाचे तुलनेत सोपे काम चटकन पसरले. धर्मश्रद्धेच्या (इमान) मजबुतीसाठी धार्मिक कर्मकांडाचे अनुपालन आणि या धर्मविचारांचा प्रसार करणे हेच जीवनकार्य बनवले गेले. मृत्यूनंतरचे शाश्वत जीवन इतकेच अंतिम सत्य म्हणून रुजवण्यात आले. धर्माने जीवन नियंत्रित झाले. जीवनातील दुःख आणि ऐहिक यश यांना अटळ प्राक्तन समजले जाऊ लागले. खरे तर इस्लामिक तत्त्वज्ञानात कर्मातून फलप्राप्ती आहे याकडे दुर्लक्ष झाले.
धार्मिक चळवळीत जनता मोठ्या प्रमाणात सहभागी झाली, त्यामुळे मुस्लिमांचा वावर धर्मस्थळांच्या सभोवती दिसू लागला. त्यांचे धार्मिक दिसणे आणि वागणे हिंदूंच्या नजरेत भरण्याइतपत बदलले. मुस्लिमांनी स्वीकारलेली धार्मिक आयडेंटिटी जगण्यात आलेल्या शुद्ध असुरक्षिततेच्या भावनेतून आली असली, तरी दुरून पाहणाऱ्यांना, हिंदूंना ही आयडेंटिटी राजकीय आहे असे वाटते. या आयडिंटिटीमध्ये त्यांना धर्मांधता जाणवू लागली. केवळ वेशसाम्यामुळे मुसलमान लादेन आणि अल कायदाचे भीतीदायक समर्थक आहेत असे वाटू लागले. हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांनी हा माहोल हिंदूंना डिवचण्यासाठी, धोक्याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांचा धार्मिक आत्मसन्मान जागा करण्यासाठी वापरला. मुस्लिमांबद्दल संशयाचे वातावरण तयार करण्यासाठी, त्यांच्या देशनिष्ठेबद्दल प्रश्न निर्माण करण्यासाठी मुस्लिमांनी स्वतःच निर्माण केलेल्या दृश्य वातावरणाचा पद्धतशीरपणे वापर केला गेला. परिणामी, हिंदू-मुस्लिमांत दुरावा उत्पन्न होऊन मुस्लिमांना परकेपणाचा अनुभव येऊ लागला. परकेपणाची बोचणारी सल आणि देशप्रेमाबद्दल घेतला जाणारा संशयाचा जीवघेणा कटू अनुभव भारतात केवळ मुस्लिमांच्याच वाट्याला आला आहे. दलितांनी अनुभवलेले अस्पृश्यतेचे दुःख आणि मुस्लिमांच्या देशनिष्ठेबद्दल संशय व्यक्त होण्याने होणारी वेदना या समांतर आहेत. इतरांना याची कल्पना येणे कठीण आहे.
मुस्लिम प्रश्नाची दुसरी बाजू त्यांच्या पराभूत मानसिकतेत आहे. फाळणीनंतर न्यूनगंडातून आलेली लाचारी मुस्लिमांना अधिकाधिक परावलंबी बनवत आहे. त्यांनी स्वीकारलेला दैववाद हा आध्यात्मिक विचारापेक्षा प्राप्त प्रतिकूल परिस्थितीत मानसिक आधारासाठी स्वीकारलेला मार्ग आहे. नव्या परिस्थितीची आव्हाने पेलण्यासाठी इस्लामिक विचारांना विकसित करण्याची तयारी नाही. संपूर्ण भर इस्लामचे सोपे सिंबॉल आणि बाह्य दर्शनी अवतार स्वीकारण्यावर आणि कर्मकांडांचे अनुपालन करण्यावर आहे. इस्लाम, ड्रेस कोड आणि व्यक्तिगत नजात, आखरत (मोक्ष) प्राप्तीसाठी नमाज पठण एवढ्यापुरताच आचरणात आहे. स्वर्गप्राप्तीच्या धडपडीत इस्लामिक विचार अति व्यक्तिवादी आणि व्यक्तिमर्यादित, संकुचित बनला आहे. इस्लामचा मानवतावादी आणि व्यवस्थात्मक विचार लोप पावत आहे. धर्माने मांडलेला मानवमुक्तीचा विचार संकुचित झाला आहे.
अल्लाहने धर्मग्रंथ कुरआनचे वाचन आणि अध्ययन करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिला आहे. अल्लाहने आपला शब्द कोणाच्या तरी हवाली केलेला नाही. मानव आणि आपल्यामध्ये मध्यस्थाचा अडसर ठेवला नाही. कुरआनचे विशेष अध्ययन केलेल्या वर्गाने मात्र अल्लाहने प्रत्येक व्यक्तीला दिलेल्या अधिकारावर अतिक्रमण केले आणि तो अधिकार आपल्याकडे खेचून घेतला. सामान्य माणसांनी अंधविश्वासाने स्वतःची बुद्धी धर्ममार्तंडांकडे गहाण ठेवण्यापर्यंत प्रगती केली. परिणामी, ज्ञानाची व्याप्ती अध्यात्मापर्यंत मर्यादित झाली. पुन्हा, आध्यात्मिक ज्ञानसुद्धा चिकित्सकपणे आणि स्वकष्टाने प्राप्त करण्याऐवजी निव्वळ ऐकीव उसनवारीवर समाधान मानले गेले. त्यामुळे खुद्द अल्लाहने प्रदान केलेला मूलभूत धर्माधिकार मुस्लिम व्यक्तीने गमावला आहे.
श्रद्धावान बनण्याचे आणि न बनण्याचे भाग्य मी निश्चित करतो, असे परमेश्वर म्हणतो. व्यवहारात प्रत्येकजण श्रद्धेनुरूप परमेश्वर निवडतो किंवा परमेश्वराला श्रद्धाळूच परमेश्वर ठरवितो असे दिसते. धार्मिक श्रद्धेतील टोकाचे मतभेद, विरोध, अंतर्विरोध अगदी प्रेषितांनाही मिटवता आले नाहीत, किंवा दस्तुरखुद्द परमेश्वरानेही मिटवले नाहीत. एकाच वेळी परस्परांचे विचार खोडणाऱ्या धर्मसुद्धा जगात एकत्र नांदतात. शेवटी, ही मानवी जगाची मर्यादा आहे, इतके आपण समजून घेऊन परस्परांच्या श्रद्धेचा आदर करणे जास्त शहाणपणाचे आणि संघर्ष आणि रक्तपात टाळण्यासाठी योग्य आहे. 'तुझा धर्म तुझ्यासोबत, माझा धर्म माझ्यासोबत आणि शेवटी सर्वांना एकाच परमेश्वराकडे जायचे आहे,' हा समन्वय कुरआनने सुचविला आहे. ह्या विचाराने मुस्लिमांचीच नव्हे तर धार्मिक विचारांचीही कोंडी फुटण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment