आमीरचे नग्नसत्य - Nude aamir Khan
आमीर जर इतका आदर्श आहे, मूल्यांची कास धरणारा आहे, इतका आमच्या त्याच्यावर विश्वास आहे, तर मग तो या एका दृश्याने अचानक इतका वाईट का ठरवला जातोय, जे त्याच्या तत्त्वांचा आत्यंतिक आदर करतात त्यांचा विश्वास इतका तकलादू कसा? आता चक्क आमीर यू टू? असं विचारणं म्हणजे अत्यंत भाबडेपणाचं आहे. आमीर कुणी संत, महात्मा किंवा युगपुरुष नाही...
आमीर खानचं 'पीके' या चित्रपटाच न्यूड पोस्टर प्रकाशित झालं अन् सगळीकडे नुसता गहजब माजला आहे. सध्या जिकडे बघावं तिकडे आमीर खानचं न्यूड पोस्टर आणि त्याचा 'पीके' चित्रपट यांच्याच चर्चेला पेव फुटला आहे. कोणी त्याचं कौतुक करतं आहे कोणी त्याला कडाडून विरोध करतं आहे, तर कोणी त्याची खिल्ली उडवीत आहे. वाद निर्माण झाले आहेत. जनहित याचिका दाखल झाली, वकील नेमला गेला, आता म्हणे पोस्टरवर बंदी घातली गेली आहे.
हे सगळं बाजारीकरण आहे आणि एकुणात काय तर आम्ही अत्यंत भाबडेपणाने त्यांच्या या डावात फसत गेलो, आणि त्यांची योजना सफल झाली. भारतीय जनमानस आमीरच्या या कृतीनं 'कोण होतास तू, काय झालास तू' असं निराश झालं आहे. पण आमीरच्या या न्यूड पोस्टरच्या निमित्ताने तितकेच महत्त्वाचे अनेक प्रश्नदेखील उपस्थित झाले आहेत.
'पीके' फिल्मचं हे पोस्टर मुळात पोर्तुगीज गायक व्कीम बॅरिरियोसच्या अल्बमवरील कव्हरची सही सही नक्कल आहे. हे चित्र या गायकाने १९७३ मध्ये काढलं होतं. ते चित्र कॉपी केल्याचा आरोपदेखील आमीरवर आता होत आहे. आता प्रश्न पडतो तो या साऱ्याला विरोध करण्याचा. आमीर खानसारखा मूल्य-तत्त्वांची कास धरणारा आदर्श व्यक्ती न्युड पोस्टर देतो म्हणून हा हल्लाबोल. त्याने असे करायला नको होते, मग त्या ठिकाणी दुसऱ्याने असं केलं असतं तर ते आपल्याला चाललं असतं काय? म्हणजे लोकांना न्युडीटीबद्दल फार काही वाटत नाही म्हणजे ते त्यांना मान्य आहे. इतर कोणीही (नट) असं पोस्टरवर झळकलं असतं तर त्याचं फारसं काही वाटलं नसतं, मग हे दुसऱ्या कोणाचं न्युड असणंदेखील आपल्या संस्कृतीला घातक ठरलं नसतं काय, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोच.
आमीर जर इतका आदर्श आहे, मूल्यांची कास धरणारा आहे, इतका आमच्या त्याच्यावर विश्वास आहे, तर मग तो या एका दृश्याने अचानक इतका वाईट का ठरवला जातोय, त्याला त्याने आजवर निर्माण केलेल्या स्वत:च्या या आदर्श वगैरे प्रतिमेची चिंता नाही काय? हा आमीर खान आहे म्हणजे निश्चित त्यामागे काहीतरी निराळा उद्देश आहे, कथानक काय आहे हेही न जाणता हा त्याबद्दलचा विश्वास असा एका क्षणात धुऊन कसा काय निघू शकतो? जे त्याच्या तत्त्वांचा आत्यंतिक आदर करतात त्यांचा विश्वास इतका तकलादू कसा?
म्हणून आपण आमीरबद्दलच बोलू या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमीर खान हा एक व्यावसायिक अभिनेता आहे. त्याने त्याच्या आजवरच्या चित्रपटांच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. 'कयामत से कयामत तक'मधल्या चॉकलेट हिरोनंतर लगेच त्याने 'राख' नावाच्या चित्रपटात अँग्री मॅनची भूमिका तितक्याच समर्थपणे बजावली. त्यानंतर त्याच्या विविध भूमिकांमुळे लक्षात राहिलेले त्याचे चित्रपट म्हणजे गजनी, धूम-थ्री, तलाश, मंगल पांडे, थ्री इडीयट्स इत्यादी. अशा अनेक चित्रपटांमधून त्याने त्याचे वेगळेपण प्रेक्षकांच्या मनावर अत्यंत प्रभावीपणे ठसवले आहे. तो कधीही एका विशिष्ट इमेजमध्ये अडकलेला नाही. त्यानंतर कलावंताची सामाजिक भूमिका निभावताना तो 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमातून तर प्रत्येकच संवेदनशील मनाच्या हृदयस्थानी जाऊन बसला. त्यातील प्रत्येक एपिसोडमधल्या त्याच्या अश्रू गाळण्याचीदेखील चर्चा होऊ लागली.
आमीर आज काय तर आरोग्य मंत्र्यांना भेटला, उद्या काय तर तमक्यांना भेटला, त्याला या सगळ्याच सामाजिक प्रश्नांबद्दल किती कळकळ आहे, हे चित्र प्रसार माध्यमांच्या, सामान्यजनांच्या मनावर अक्षरश: कोरले गेले. मग आमीर काय तर पुरस्कारांच्या सोहळ्याना उपस्थित राहात नाही, त्याला असल्या गोष्टींमध्ये रस नाही, त्याला अमकी चिल्लर गोष्ट आवडत नाही...करता करता या आमीर नावाच्या एका अत्यंत कुशल अभिनेत्याची इमेज आमच्या मनात एखाद्या आदर्शवाद्यासारखी अधोरेखित झाली.
'सत्यमेव' हीदेखील त्याची भूमिका होती आणि एक व्यवसायिक अभिनेता म्हणून त्याने त्याच्या प्रमोशनसाठी जीव ओतला. तेवढ्या काळासाठी स्वत:ची तशी प्रतिमा निर्माण करण्यात तो कमालीचा यशस्वी झाला. 'सत्यमेव' हा कार्यक्रम आमीर खानचा काही एकट्याचा कार्यक्रम नव्हता. (मुळात हा कार्यक्रमदेखील एका विदेशी कार्यक्रमाची नक्कलच आहे) त्यासाठी एक रिसर्च टीम होती. या निमित्ताने तो वाहिनीच्या टीमसोबत फिरला असेल, त्याने व्यथा टिपल्या असतील.
स्वत:ची एक संवेदनशील समाजसेवी म्हणून इमेज बनवण्यासाठी तो त्या-त्या वेळी त्या-त्या व्यासपीठांवरही उपस्थित राहिला. (संदर्भ अण्णा हजारे) 'सत्यमेव'मध्येदेखील त्याने निवेदकाची एक व्यावसायिक भूमिकाच पार पाडलेली आहे. पण आम्ही मात्र त्याला आदर्शवादाच्या चौकटीत बसवीत देव मानून चक्क देव्हाऱ्यातच बसवून टाकलं. म्हणूनच त्याच्याबद्दलच्या इतक्या दिवसांच्या प्रतिमेला असे क्षणातच तडेदेखील गेले.
आता चक्क आमीर यू टू? असं विचारणं म्हणजे अत्यंत भाबडेपणाचं आहे. मालिकेत रामाची भूमिका करणाऱ्या नटाला राम समजून पाया पडायचे आणि मग तो सिगारेट पिताना दिसला तर संस्कृती बुडाली म्हणून छाती पिटायची, असंच आहे हे. आमीर कुणी संत, महात्मा किंवा युगपुरुष नाही. विधवा आणि परितक्त्यांच्या संदर्भात 'सत्यमेव'च्या एका भागात अश्रू ढाळणाऱ्या आमीरनंही एक बायको सोडून दुसरी केली आहे. (हे त्याचं अत्यंत खासगी आयुष्य आहे आणि आम्हाला त्यात दखल देण्याची गरजही नाही.) मात्र आम्हाला थोडं हटके दिसताच त्याला देवत्व बहाल करण्याची आदीम खोड आहे.
आता 'पीके' आणि त्याच्या त्या न्यूड (की सेमी न्यूड?) पोस्टरबद्दल...थेटच सवाल हा की एक कुणी आमीर खान नावाचा नट नग्न झाल्यावर संस्कृती धोक्यात कशी येते आणि कथित संस्कृतीरक्षकांच्या अंगावर शहारे वगैरे कसे येतात? त्यामुळे आता घराघरातील तरुण पोरं नागवी होऊन रस्त्याने धावायला लागणार आहेत काय? की समस्त स्त्रियांचा विनयभंग झाला आहे? मुळात त्या चित्रपटाचं कथानक काय आहे? त्यात हे दृश्य आवश्यक होतं का? कलात्मकदृष्ट्याही एखादी गोष्ट आवश्यक असू शकते. १५ न्यूड सीन्सच्या चित्रपटांना आजवर ऑस्कर मिळालं आहे. 'मॉन्स्टर' नावाच्या चित्रपटात चार्लीज थेरॉन नावाच्या नटीनं एका वेश्येची भूमिका केली होती. वासनाविकृत गिऱ्हाईकांच्या ओबरडण्यानं सतत घायाळ असणाऱ्या तिला पुरुषांचाच किळस वाटू लागतो आणि मग ती एका तरुण स्त्रीच्या प्रेमात पडते. गिऱ्हाईकी (शी!) नसते तेव्हा ती आपल्या मैत्रिणीच्या बाहुपाशात विवस्त्र पहुडलेली असते...याला ऑस्कर देण्यात आला होता. प्रश्न 'न्युडीटी'चा नाही; त्यामागच्या भावनेचा आहे. आमीरच्या या चित्रपटात या दृश्याच्या मागचे नेमके संदर्भ काय, हे अद्याप माहिती नाही. हं हे मात्र खरे की आमरने हे पोस्टर आणून फुकटात चर्चा घडवून आणली आहे. मागे सचिन तेंडुलकरने म्हणे ठाण्यातल्या कुठल्यातरी नव्याने स्थापन झालेल्या सहकारी बँकेकडनू २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी होती आणि ती साऱ्याच वृत्तपत्रांनी आवर्जून छापली होती. सचिनला खरेच २० लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागते यावर माझा तरी विश्वास नाही...जाहिराती अशाही असू शकतात. आपण का फसायचं हा सवाल
आहे. वर्षाअखेरीस १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'पीके'चं कथानक कॉमेडीच्या अंगानं जाणारं अत्यंत सरळ पण विचारप्रवृत्त करणारं आहे, असं कळतं. त्यात मैत्री आणि शत्रुत्व आहे, पीकेला पडणारे अनेक प्रश्न आहेत...आमीर ज्या 'पीके'ची भूमिका करतो आहे, तो त्याचा एक प्रवास आहे. ती अत्यंत 'इनोसंट' अशी व्यक्ती आहे. या 'इनोसन्सी'मध्ये तो अनेक मित्र जोडतो, शत्रूंनाही आपलंसं करतो, पण जीवनाच्या प्रत्येक अंगाकडे पाहण्याचा त्याचा स्वत:चा एक स्वतंत्र आणि हटके विचार आहे. हा विचार तो कोणावर थोपवत नाही, पण तरीही त्याच्या या वेगळ्या विचरांनी आजूबाजूचे लोक प्रभावित होतात. त्यांच्यात परिवर्तन होऊ लागतं. त्याचं हे पोस्टरवरचं न्यूड रूपदेखील असेच काही प्रश्न घेऊन समाजासमोर येणार असावं. त्याचं असं हे नागवं रूप पाहून सुरुवातीला बालीश अशा संस्कृतीरक्षकी थाटाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
'पीके'नं हा प्रश्न विचारला असावा की न्यूडीटीबद्दल भारतीय सामजाची भूमिका काय? खरंतर चर्चा झडायच्याच असतील तर न्युडीटीवर झडायला हव्यात. आता न्युडीटी आणि त्यावरच्या चर्चा नंतर गंभीरपणे कदाचित 'पीके'च्या निमित्तानं होतीलही. न्युडीटीचे प्रकार आहेत. खासगी, सार्वजनिक, बाल, शृंगारिक आणि अगदी धार्मिकदेखील. धार्मिक न्युडिटीकडे पूज्य भावाने पाहिले जाते. त्यावर टीकाच कशाला साधी चर्चा करण्याचीही मोकळीक आपल्या समाजात नाही. तितकी दहशत तर आहेच! 'पीके' त्याच्या चित्रपटात वरवर हसविणारे पण नंतर खूप खोल असे 'दिलही मे खिचती है' थाटाचे प्रश्न विचारतो, असे कळते. 'पीके'च्या पोस्टरच्या निमित्ताने त्यानं हा प्रश्न विचारला असावा की नग्नता पचविण्याइतका तुमचा समाज प्रगल्भ झाला आहे का?
आता राहता राहिला बाजारीकरण, बुद्धिवाद्यांची भूमिका आणि नैतिकतेचा सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार आहेत. त्यासाठी त्यांची वस्त्रसज्जा करण्याचे कंत्राट मनीष मल्होत्रा नामक आघाडीच्या फॅशन डिझायनरला देण्यात आले आहे. का कोण जाणे मला सतत प्रश्न पडतो आहे, अस्सल भारतीय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी भारतीय वेशातच का जाऊ नये? साधेपणा आणि राष्ट्रीयता का जोपासून नये? ही बाजारशरणता नाही का? नैतिकतेच्या पातळीवर या घटनेकडे पाहिले जाऊ शकत नाही का?
वस्त्रात लपलेली अनैतिकता आम्ही पचवितो. भीषण म्हणजे आताशा ती पूज्यही मानली जायला लागली आहे. धर्म, देश, जात, पंथ, रीत, रिवाज, परंपरा या साऱ्यांच्या चौकटी मोडून आणि वस्त्रे उतरवून अचानक तुमच्या समोर येणाऱ्या नैतिकतेचा असा भारी चटका लागतो मग. सत्य हे नग्नच असते, त्याला वस्त्रांचंही लांछन लागलेल नसतं म्हणून त्याला नग्नसत्य म्हणण्याचा प्रघात पडला असावा.
आम्हाला; सोयीच्या भूमिका घेण्याची सवय लागलेल्यांना नग्नसत्य पचत नाही अन् मग ते त्यावर हल्ले करीत सुटतात. संस्कृती आणि समाजरक्षणाचे त्याला मुलामेही देतात. आमीरनं नग्न होऊन समाजासमोर एक प्रश्न टाकला असावा, उत्तर देण्याचं धाडस आहे का? की हे सत्यदेखील चिरडूनच टाकायचं आहे? या सगळ्या प्रकाराच्या निमित्ताने 'वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता...'या ग्रेसांच्या ओळींचे अतिशय वेगवेगळे संदर्भ आणि अर्थही मनामध्ये रुंजी घालताहेत.
No comments:
Post a Comment