Thursday, August 30, 2018

OCD Obsessive compulsive disorder in Marathi

ओसीडी

एखाद्या दिवशी एखाद्या गाण्याचे सूर आपला पिच्छा सोडत नाहीत. पण एखाद्या गोष्टीविषयी अकारण विचार मनात सुरू झाला आणि तो गोष्ट कितीही मनातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट मनातून जात नसेल तर मात्र ती एक मनोविकृती होते. याला "ऑबसेसिव्ह कंपलसिव्ह न्यूरॉसिस' किंवा "ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर' (ओसीडी) असं म्हणतात.

उदाहरणार्थ, घराला कुलूप लावल्यानंतरही सारखं आपण नीट ते लावलंय की नाही हे बघण्यासाठी फिरून पुन्हा पुन्हा ते कुलूप ओढून बघणं किंवा गॅस बंद केला की नाही, नळ बंद केला की नाही हे वारंवार बघितलं जाणं, किंवा हात स्वच्छ असले तरी वारंवार धूत राहणं, इत्यादी. पण ओसीडीमध्ये यांचा अतिरेक होतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींत काहींचे तर दिवसातले 8, 10 किंवा 12 तासही जातात! अर्थातच या सगळ्या गोष्टींचा त्याच्या आणि सामाजिक संबंधांवर, कामावर आणि एकूणच दैनंदिन आयुष्यावर प्रचंड परिणाम व्हायला लागतो. इतका, की नॉर्मल आयुष्यच जगणं हे स्वतःला आणि आजूबाजूच्या इतरांनाही शक्‍य होईनासं होतं. ओसीडी झालेल्या व्यक्ती आपल्या नादिष्टपणातच जास्त काळ रमत असल्यामुळे त्यांचे वैयक्तिक संबंध धोक्‍यात येऊ शकतात. ओसीडी झालेल्या व्यक्तींना त्यांच्या काही सवयींमुळे बऱ्याचदा भयंकर शारीरिक त्रास भोगावा लागतो. उदाहरणार्थ, साबणानं किंवा गरम पाण्यानं वारंवार हात धुतल्यानं हाताची त्वचा रखरखीत होऊन जखमही होऊ शकते. यामुळे चिंता किंवा भीती/ भयगंड वाढतो, ही गोष्ट पुन्हा निराळीच! आणि हे त्या रुग्णाला कळतही असतं.

ओसीडी हा इतिहासात खूप पूर्वीपासून असला तरी त्याचं पहिलं वर्णन फ्रॉईडनं 1909 मध्ये त्याच्या प्रसिद्ध "रॅटमॅन' केसमध्ये करून ठेवलं होतं. ऍर्न्स्ट लॅन्झर नावाचा माणूस सैन्यात काम करत असे. सैन्यामध्ये कोणाला शिक्षा द्यायची झाली तर त्याला विवस्त्र करून उंदीर असलेल्या खोलीत सोडतात आणि हे उंदीर त्या माणसाचं ढुंगण फाडून खातात, असं लॅन्झरनं ऐकलं होतं. अशी शिक्षा आपल्या वडिलांना आणि मैत्रिणीला होईल अशा आणि इतर अनेक विचारांचं लॅन्झरला ऑब्सेशन झालं होतं. यामुळे लॅन्झर काही गोष्टी चित्रविचित्र तऱ्हेनं करत बसे. फ्रॉईडनं त्याच्या पद्धतीनं ही केस बरी केल्याचा दावा केला असला तरी एकूणच या केसबद्दल अनेक वादविवाद झाले.

एका मुलीवर लहानपणी तिच्या आजोबांनी लैंगिक अत्याचार केले होते. तिला या प्रकाराची इतकी घाण आणि किळस वाटली, की त्यानंतरच्या आयुष्यात तिला कुठेही घाण दिसली की हात स्वच्छ असले तरी ते तास न्‌ तास धूत बैस, सतत केर काढ, असं ती करे! ओसीडीच्या या विकारात काही वेळा माणसं गोष्ट अचूक करण्यात बराच वेळ घालवतात. इतका, की सर्वसामान्य माणसांपेक्षा त्यांना प्रचंड जास्त वेळ लागतो. उदाहरणार्थ, अशा व्यक्ती सकाळी ब्रश करत असतील तर त्यासाठी त्यांना एक-एक, दोन-दोन तास लागतात. कधी कधी हे ऑब्सेसिव्ह विचार अगदीच निरर्थक असतात. एका रुग्णाला वस्तू मोजायचा नाद इतका लागला, की तो घरातले बल्ब, खिडक्‍या, दरवाजे आणि रस्त्यावरून जाणाऱ्या बस, टॅक्‍सीज, छत्र्या मोजत बसे.
काही लोकांना जुगार खेळणं किंवा वाजवीपेक्षा जास्त खाणं अशा गोष्टींचं व्यसन असतं. पण याला "ओसीडी' म्हणत नाहीत. कारण जी गोष्ट ती व्यक्ती वारंवार करते तिच्यामुळे त्या व्यक्तीला थोडा तरी आनंद आणि सुख मिळत असतं. ओसीडीमध्ये मात्र तो मिळत नाही. उलट चिंता प्रचंड वाढते. या चिंतेचे लैंगिक परिणामही होतात. ओसीडी असलेल्या पुरुषांपैकी 50 टक्के पुरुषांत काही ना काही तरी लैंगिक विकार हा असतोच. त्यातल्या 37 टक्के पुरुषांना तर लैंगिक उत्थापनच होत नाही. ओसीडी झालेल्या काही व्यक्तींना एकसारखे लैंगिक विचारच मनात येतात, किंवा सतत तशीच स्वप्नं पडतात. आपण कोणाला तरी स्पर्श करतोय, कुरवाळतोय, चुंबन घेतोय किंवा चक्क सेक्‍स करतोय, असं या मंडळींना सतत वाटतं आणि त्यांच्या या काल्पनिक सेक्‍समध्ये त्यांचा जोडीदार कोणीही असू शकतो, ओळखीची/ अनोळखी व्यक्ती, वडीलधारी माणसं, लहान मुलं, घरातल्या मंडळींपैकी कोणी, मित्र/मैत्रिणी, ऑफिसमध्ये बरोबर काम करणाऱ्या व्यक्ती, तर काही वेळा चक्क प्राणीदेखील!

ओसीडी आणि स्किझोफ्रेनिया यांच्यात एक मूलभूत फरक आहे. तो म्हणजे हे सततचं विचित्र वागणं हे आपल्या मनातल्या खेळांमुळेच होतंय, हे ओसीडी झालेल्या माणसाला पक्कं ठाऊक असतं. पण स्किझोफ्रेनिया झालेल्या माणसाला आपल्याला बाहेरून कुठूनतरी आदेश येताहेत आणि त्या काल्पनिक माणसाच्या किंवा संस्थेच्या किंवा गोष्टीच्या इशाऱ्याप्रमाणे सतत वागतोय, असंच वाटत राहतं आणि त्यामुळे त्याला जाणीवच नसते!

दर 100 मागे 1 असं ओसीडीचं प्रमाण आहे. पण संपूर्ण आयुष्यात ओसीडी केव्हातरी होण्याचं प्रमाण शंभरामागे 1.6 ते 2.5 आहे. हे प्रमाण मधुमेह आणि दमा यांच्याइतकंच मोठं आहे. बेकार आणि घटस्फोट झालेल्यांमध्ये हे प्रमाण जास्त सापडतं. स्त्री आणि पुरुष यांच्यात ओसीडीचं प्रमाण सारखंच असतं. साधारणपणे लहानपणी किंवा पौगंडावस्थेत हा विकार हळूहळू सुरू होतो, पण एकदा तो गंभीर झाला की तो विचित्र स्वरूप धारण करतो. वयाप्रमाणे तो कमीही होऊ शकतो. गंमत म्हणजे ओसीडीच्या रुग्णाची बौद्धिक क्षमता ही सर्वसाधारण बौद्धिक क्षमतेपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलंय.

ओसीडीबरोबर इतरही व्याधी उद्‌भवू शकतात. उदाहरणार्थ, ओसीडी झालेल्या रुग्णांपैकी 80 टक्के लोकांना नैराश्‍याचे झटके येऊ शकतात. कित्येक जणांना तर आपल्याला ओसीडी आहे हे जाणवल्यामुळे नैराश्‍य येतं. ओसीडी झालेल्या रुग्णांना नैराश्‍य येणं बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं. कारण ओसीडी झालेल्या 50 टक्के रुग्णांमध्ये आत्महत्येचे विचार सतत येत असतात, तर 15 टक्के रुग्णांनी आत्महत्येचा प्रयत्नही केलेला असतो, असं एका पाहणीवरून दिसून आलंय.

ओसीडीचे रुग्ण काही वेळा स्वतःच्या नादिष्टपणातून सुटका करून घेण्यासाठी इतर कोणत्या तरी गोष्टीच्या मागे लागतात. उदाहरणार्थ, दिवसातले 12-14 तास व्हिडिओ/ टीव्ही बघणं. पण मग ते याच्या इतके आहारी जातात, की वेळ घालवण्याच्या इतर गोष्टींचा त्यांना विसरच पडतो. ओसीडी झालेल्या काही मंडळींच्या मनात देव, राक्षस किंवा एखादा भयानक आजार अशा गोष्टी एक तर त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या जवळच्या आवडत्या व्यक्तीला प्रचंड त्रास देतील, असे विचार सतत येतात.

या ओसीडीचे अनेक चित्रिविचित्र प्रकार आहेत. प्रत्येक गोष्टीत सिमेट्री बघणं, धर्माविषयी, लैंगिकतेविषयी किंवा आक्रमकतेविषयी टोकाची मतं आणि वागणूक असणं आणि नादिष्ट असल्याप्रमाणे किंवा मंत्रचळ लागल्याप्रमाणे वागणं, हेही ओसीडीत बऱ्याचदा होतं. एका बाईला आपला नवरा आपल्याला विष देतोय असंच सतत वाटायचं. तसंच आपण आपल्या आईला जिन्यावरून ढकलून देतोय, असंच एका मुलीला सतत वाटायचं. एक मुलगी जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडविषयी विचार करायची तेव्हा तो मरून जावा, असाच विचार तिच्या डोक्‍यात यायचा. जेव्हा तिची आई जिना उतरायची तेव्हा ती त्यावरून पाय घसरून पडावी आणि तिची मान मोडावी, असंच तिला वाटायचं. पण नंतर या विचारांनी तिला हिस्टेरिकल व्हायला व्हायचं. याचं कारण तिचं या दोघांवर प्रेम होतं. मग असं आपल्याला का वाटावं, या भावनेनं तिला आत्महत्या करावीशी वाटायची. एक अत्यंत देवभक्त असलेला रुग्ण तर रडकुंडीस आला होता. देवाच्या पूजेच्या वेळी देवाविषयी अत्यंत हिडीस आणि अश्‍लील विचार त्याच्या मनात येत आणि ते का येत, हे त्याला कळत नसे.

कुठल्याही गोष्टींचा उगाचच साठा करून ठेवणं (होर्डिंग) हाही एक ओसीडीचाच प्रकार आहे. हा विकार असणाऱ्या एकानं अनेक वर्षं सगळी वर्तमानपत्रं, मासिकं, वह्या, पुस्तकं, कच्ची टिपणं, कागदी पिशव्या, वेगवेगळ्या याद्या, बाटल्या, जुनी टीव्ही गाईड, कॅटलॉग्ज, लहानपणापासूनचे सर्व जुने कपडे, चपला, बूट, जुनी पत्रं या सगळ्या वस्तू जपून ठेवल्या होत्या. यातल्या कित्येक गोष्टींना तो वर्षानुवर्षे हातही लावत नसे. अशा असंख्य गोष्टी जमवून ठेवल्या नाहीत तर त्याच्या मनाचा तोलच बिघडे. हा प्रकार नेहमीच्या ओसीडीसारखाच जरी असला तरी त्यासाठी ओसीडीची औषधं चालत नाहीत.
कित्येकदा ओसीडीचे रुग्ण ती कृती प्रत्यक्षात न करता त्याचे विचार मात्र मनात सतत घोळवत असतात. म्हणजे हात धुणं किंवा कुलूप लावलंय की नाही ते सतत तपासणं, अशा गोष्टी त्यांनी जरी प्रत्यक्ष केल्या नाहीत तरी त्या गोष्टी त्यांच्या मनातल्या मनात असंख्य वेळेला चालूच असतात. असे रुग्ण ओसीडीच्या एकूण रुग्णांच्या 50-60 टक्के आढळतात. अशा रुग्णांना मानसशास्त्रात "प्युअर ओ' असं म्हणतात.

अल्बर्ट आइनस्टाइन आणि चार्लस डार्विन यांच्याप्रमाणेच अमेरिकन रेडिओचा प्रसिद्ध निवेदक हॉवर्ड स्टर्न याला ओसीडीचा विकार होता असं म्हणतात. स्टर्न तर कुठल्याही पुस्तकाची पानं उलटताना फक्त गुलाबी रंग लावलेल्या बोटाचाच वापर करे. डेव्हिड बेखम या जगप्रसिद्ध खेळाडूला गोष्टी एका सरळ रेषेत ठेवण्याची किंवा जोड्याजोड्यांनी ठेवण्याची खोडच आहे. त्याच्या टेबलवर जर तीन पुस्तकं असतील तर तो त्यातलं एक काढून किंवा त्यात आणखी एका पुस्तकाची भर टाकतो. प्रसिद्ध अमेरिकन इंजिनिअर, उद्योजक, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक हॉवर्ड ह्यूजेस, अनेक पारितोषिकविजेत्या लिओनार्डो रिकॅपिओ, हॅरिसन फोर्ड, पेनेलोपी क्रूझ, कूमेरून डायझ अशा अनेक नट/नट्यांनाही ओसीडीचा त्रास आहेच. कॅमेरून डायझ तर दर वेळी दरवाजातून जाताना त्याचं हॅंडल जोरात घासते आणि दिवसातून ती स्वतःचे हात तर असंख्य वेळा धुते! डोनाल्ड ट्रमडल जंतुसंसर्गाच्या भीतीनं लोकांशी हस्तांदोलन करायला घाबरतो. निकोला तेस्ला या ग्रेट पण उपेक्षित वैज्ञानिकालाही ओसीडीनं त्रस्त केलं होतं.

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...