Stree Janma hi tujhi kahani
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
‘दुनिया मे हम आये है
| तो जिना ही पडेगा ॥
जीवन है अगर जहर तो पिना ही पडेगा
|गिर गिर के मुसिबत में सम्हलते ही रहेंगे
|जल जाये मगर आग पे जलते ही रहेंगे ॥
या ओळी आहेत ‘मदर इंडिया’ या
सिनेमातल्या. या ओळींप्रमाणेच स्त्रियांचे आयुष्य आहे. जन्माला येणार्या
प्रत्येक स्त्रीसाठी हे लागू पडतं. कारण स्त्रियांचा जन्मच मुळी
हाल-अपेष्टा सोसायला झाला आहे.
अगदी जुन्या काळातल्या स्त्रियांच्या
आयुष्यात जर डोकावलो, तर लक्षात येईल की त्या स्त्रिया किती दबावात आणि
धाकात जगत होत्या. त्यांना कुठल्याच प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. साधे
त्यांचे मत मांडायचासुद्धा अधिकार नव्हता. एकत्र कुटुंंब पद्धती होती
त्यामुळे सतत रांधा वाढा आणि उष्टी काढा आणि पोरांना जन्माला घाला. बस
एवढेच त्यांना माहीत होते. त्यावेळी लग्नसुद्धा किती लवकर होत असत.
खेळण्याच्या वयात चूल आणि मूल सांभाळावे लागले. नवरा म्हणजे काय हे सुद्धा
त्या वयात समजत नव्हते. लग्नसुद्धा घरच्यांच्या मर्जीने होत असे. घरातल्या
मोठ्यांनी ठरवले त्याच मुलाशी लग्न मग तो दिसायला कसाही असो, बिजवर असो,
अगदी तिच्या वयापेक्षा खूप मोठा (वडिलांच्या) वयाचा जरी असला तरी, त्याला
मोठाले मूल जरी असले तरी लग्न त्याच्याशीच करावे लागे.
स्त्री ही सतत कोणाच्या न कोणाच्या
धाकाखाली वावरत आली आहे. लग्नाच्या आधी आई-वडिलांचा धाक, मोठी झाल्यावर
भावाचा धाक, लग्न झाल्यावर सासू-सासर्याचा धाक म्हणजे सतत दडपण दडपण आणि
दडपण... त्या काळामध्ये स्त्रियांवर किती अत्याचार झालेत याची तर हद्दच
नव्हती. नवर्याचे निधन झाले तर तिचे केशवपन (सोहळा) करून टाकायचे की संपले
बिचारीचे आयुष्य. तिला कुठल्याच शुभ कार्यात भाग घेता यायचा नाही. चांगले
दिसायला नको म्हणून केस काढून टाकायचे. चांगले चुंगले खायला द्यायचे नाही.
कारण कारण काय तर तिची वृत्ती सात्त्विक राहावी, तिला कुठली इच्छा उत्पन्न
होऊ नये म्हणून अगदी साधे जेवायला द्यायचे. तिची सावली कोणावर पडू नये
म्हणून एका खोलीतच पडली राहू द्यायचे. निजायला फक्त सतरंजी द्यायचे आणि ते
सुद्धा जमिनीवर झोपायचे. काय वाटत असेल तिला जिच्या आयुष्याची सुरवात झाली
नाही तिच्यावर ही वेळ यावी किती वेदना होत असतील तिच्या मनाला. तिला हेवा
वाटत असेल आपण मागच्या जन्म काही तरी पाप केले असतील म्हणून हे भोग आपल्या
वाट्याला आले असतील.
खरं सांगायचे झाले तर निसर्गाने स्त्रीला
कोमलता, सौंदर्य, ममत्व आणि मातृत्व हे गुण प्रदान केले आहेत. त्याचा नीट
आदर केला पाहिजे. स्त्रीने जर मनाशी ठरवले, तर ती काहीही करू शकते. वेळ
पडली तर ती मायेचे रूप धारण करते आणि वेळप्रसंगी चंडीकेचेसुद्धा रूप धारण
करू शकते.
त्या काळी स्त्रीला शिक्षणाची परवानगी
नव्हती. विरोध केल्या जायचा. स्त्रिया जर शिकल्या तर त्यांना वैधव्य येतं,
असं सांगितल्या जात असे. म्हणून भीतिपोटी त्या शिक्षण घेत नव्हत्या आणि
घरात वादंग निर्माण व्हायचे. कशाला नको ते डोहाळे सुचतात, अभद्र मेलं ते
लक्षण आणि शिक्षण घेऊन काय देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे. आपले घरकामात
लक्ष घालावे, चूल आणि मूल एवढे नीट सांभाळा म्हणजे झाले. अशा तिला टोचण्या
मिळत होत्या. जोतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. रमाबाई
रानड्यांनी ती पुढे चालू ठेवली. हळूहळू स्त्रिया शिकू लागल्या. समाजात
तसतशी सुधारणा होत गेली. या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. स्त्रियांमध्ये
थोडा धीर यायला लागला, थोडी हिंमत वाढायला लागली. त्या शिक्षण घेऊ लागल्या
आणि शिक्षणामुळे बर्याच स्त्रियांमध्ये अजूनच त्यांच्यात हिंमत वाढली.
तिला तिचं मत मांडण्यासाठी हिंमत वाढली. काय चूक किंवा काय बरोबर आहे, हे
निर्णय घ्यायची क्षमता वाढली आणि आज अशी वेळ आली की प्रत्येक स्त्री ही
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरायला लागली. पुरुषांप्रमाणे
नोकरी करून पैसा कमवून स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्यात. सगळ्या कार्यात
आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीत आल्यात, एवढेच नाही तर देशाच्या पंतप्रधान
होण्याचा मानसुद्धा तिने कमावला. आज असे कुठलेच विश्व नाही ज्यात
स्त्रिया मागे पडल्या असतील. खेळापासून तर अंतराळापर्यंत जाण्याचा मान
त्यांनी मिळवला आहे. प्रगती केली आहे. ह्याचे परिणाम असे झाले की, स्त्रिया
पुरुषांपेक्षा श्रेष्ठ व्हायला लागल्याबरोबर पुरुषांचा अहंकार जागा झाला.
पुरुषांनी नेहमीच स्त्रीला दुय्यम दर्जा दिला. त्यांच्यातला पुरुषार्थ जागा
व्हायला लागला. स्त्रियांचा आदर करणे, सन्मान करणे हे पुरुषांना शिकवले
जात नाही, तर स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे, ती आपल्या हक्काची (मालकीची)
वस्तू समजतो. आपल्याला पाहिजे तेव्हा ती मिळाली पाहिजे असे तो समजतो. पुरुष
स्त्रीची नेहमी दासी म्हणूनच अवहेलना करतो. पण स्त्री ही लग्नानंतर आपल्या
पतीला दीर्घ व निरोगी आयुष्य लाभावं म्हणून वडसावित्रीची पूजा करते, उपास
तापास, व्रत वैकल्य करते. नवर्याबरोबर सती जाणार्या स्त्रियासुद्धा
होत्या पण कालांतराने सती जाण्याची पद्धत बंद पाडली. फार बरे झाले नाही तर
फार जीवघेणी पद्धत होती ही.
देशात अनेक राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक
परिवर्तन घडत गेले. स्त्रियांना त्यांचा हक्क मिळाल्यामुळे त्यांनी सगळे
जुने विचार सोडून देऊन नव्या जोमाने पुढे आल्या. ह्या सगळ्या गोष्टींमुळे
समाजात अनेक उलथा-पालथी होत गेल्या. स्त्रियांच्या बाबतीत काही चांगल्या तर
काही वाईट गोष्टी घडू लागल्या. मुलं-मुली शाळा कॉलेजात एकत्र शिक्षण घेऊ
लागल्या. घरातले वातावरणसुद्धा मोकळे झाले. मुला-मुलींना खूप जास्ती
प्रमाणात सूट मिळत गेली. त्याचे परिणाम असे झाले की काही मुलं-मुली हे खूप
बिनधास्त राहायला लागले. एकत्र हॉटेलिंग करणे, सिनेमाला जाणे, फिरायला जाणे
हे प्रकार खूप वाढले. मग त्यातून प्रेमसंबंध वाढायला लागले. मग
लग्नापर्यंत गोष्टी येऊन ठेपल्यावर घरच्यांनी जर संमती दिली नाही तर पळून
जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढले. लग्न करून घरी आल्यानंतर घरच्यांना हे
लग्न पसंत नसल्यामुळे मुलीचा मानसिक छळ होऊ लागला. यातूनच मग हुंडाबळीचे
प्रकार घडत गेले. सामाजिक वातावरण एकदम कलुषित झाले. स्त्री ही अजीबात
सुरक्षित राहिली नाही. मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर
भररस्त्यात ऍसिड फेकून तिला जिवे मारण्याची धमकी दिली जात असे. एवढेच नाही
तर बदला घ्यायसाठी तिच्यावर बलात्कार करायलासुद्धा मागे पुढे पाहात नाही.
गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेले. स्त्री ही अगदी सुरक्षित
राहिली नाही. अगदी ताजे उदा. म्हणजे निर्भयाचे देता येईल. एका बसमध्ये
तिच्या मित्रासमोर तिच्यावर बलात्कार केल्या गेला व त्यातच तिचे प्राण गेले
पण तिचा मित्र काही करू शकला नाही. अगदी लहान मुलींना सुद्धा समाजातल्या
नराधमांनी सोडले नाही. फारच वातावरण कलुशित झाले.
सगळ्या प्रकाराबरोबर विज्ञानाचीसुद्धा
इतकी प्रगती केली की, आज स्त्रीच्या उदरात वाढणारा अंकुर मुलाचा आहे की
मुलीचा हे काही टेस्ट केल्यामुळे समजू शकते त्यामुळे समाजात स्त्री
भ्रूणहत्येचे प्रमाण वाढायला लागले. प्रत्येकाला पहिला मुलगा हवा असतो
मुलगी असेल तर काढून टाकाचे आणि मुलगा असेल तर ठेवायचे. या सर्व प्रकारात
स्त्रियांचा मानसिक छळ सुरू झाला. एक स्त्री आपल्या उदरामध्ये आपल्या
प्रेमाचा अंकुर वाढवताना मुलगा-मुलगी भेद भाव न करता नऊ महिने आपल्या
रक्ताचे पाणी करून आपला अंकुर वाढवते. मुलगा किंवा मुलगी हा भेदभाव का
करावा. मुलगा तुमच्या वंशाचा दिवा आणि मुलगी कोणीच नाही. प्रत्येकानी
मुलाचा हट्ट केला तर मुलींनी काय करावे. वंशाचा दिवा मुलगाच वाढवणार पण तोच
मोठा झाल्यावर तुमची म्हातारपणाची काठी न होता तुमच्या हातात आधाराला काठी
देऊन तुम्हाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणार. ते चालतं पण तरीसुद्धा पहिला
मुलगा पाहिजे म्हणून अट्टहासच करता.
पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात. पण
तुमच्या या धनाच्या पेटीला तुम्ही नष्ट करायला निघाले तर ती कशी प्रसन्न
होईल. मुलगी नसेल तर प्रेम माया काय असते हे समजणार नाही. आज अशी परिस्थिती
झाली आहे की, मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. असं न हो की तुमच्या वंशाचा
दिवा वाढवायला मुलीच राहणार नाही.
‘स्त्रीच्या गर्भातली एक कोमल कळी आपल्या
आईला म्हणते आई मला आधी हे जग पाहण्याची खूप इच्छा होती पण आता आपल्यावर
होणारे अत्याचार बघून या जगात यायची इच्छाच नाही. ज्या जगात आपल्यासाठी
सुरक्षाच नाही, प्रेम, मायाच नाही. नुसते अत्याचार आहे त्या जगात मला नको
घालूस जन्माला. मला नाही यायचे या जगात.’
‘‘फूल इेसे भी है जो खिले ही नही,
जिनको खिलनेसे पहेले फिजा खा गयी ॥
ऐसे जीवन भी है जो जिये ही नही
जिनको जिने से पहेले मौत आ गयी ॥
‘स्त्री जन्मा हीच तुझी कहाणी’
No comments:
Post a Comment