कानसेन : स्वरसाजचा संग्रहक
काही वर्षांपूर्वी जुन्या हिंदी गाण्यांचा एक कार्यक्रम ठाण्याच्या महेश्वरी हॉलमध्ये ऐकायला मिळाला होता. कधीही न ऐकलेली जुनी जुनी गाणी त्या कार्यक्रमात ऐकायला मिळाली होती. वैशिष्टय़ म्हणजे गाणी जुनी असूनही त्यांचा ध्वनीदर्जा फारच उत्तम होता. त्यामुळे तो कार्यक्रम आणि तो सादर करणारे कमलेश सुतवणी Kamalesh Sutavani दोन्ही लक्षात राहिले. कधीतरी त्यांना भेटून त्यांच्या गाण्यांच्या संग्रहाविषयी आणखी जाणून घ्यावं असं मनात होतं आणि तो योग या सदराच्या निमित्ताने जुळून आला!
Kamalesh Sutavani |
कमलेशजींच्या घरी गेले तेव्हा एका जुन्या गाण्याचे सूर घरात भरून राहिले होते. कॉम्प्युटर अॅम्प्लिफायर, साउंड कार्ड, स्पूल प्लेअरच्या जोडीला एक उत्तम क्वालिटीचं टर्न टेबल आणि त्याच्यावरची ७८ आरपीएमची रेकॉर्ड बघून मला तर माझे आकाशवाणीत असतानाचे दिवस आठवले! हळूहळू गप्पांचाही सूर सापडला आणि जुन्या गीतांचा, त्या संबंधीच्या माहितीचा मोठा खजिनाच समोर आला. कमलेशजींचं वैशिष्टय़ असं की ते जुन्या गाण्यांचे फक्त संग्राहक नाहीत तर त्या गाण्यांच्या रिस्टोअरेशनचं कामही ते करतात. म्हणजे बरीचशी जुनी गाणी-जी रेकॉर्डस, स्पूल्स किंवा कॅसेटवर असतात ती कॉम्प्युटरमध्ये फीड करायची-थोडक्यात त्यांचं डिजिटलायझेशन करायचं आणि क्लीिनगसुद्धा करायचं. कारण बऱ्याचशा जुन्या गाण्यांमध्ये तेव्हाची रेकॉर्डिगची तंत्रं तेवढी प्रगत नसल्यामुळे किंवा वर्षांनुवर्षे रेकॉर्ड्स तशाच राहिल्यामुळे त्यांच्या ग्रूव्ह्ज म्हणजे खाचांमध्ये धूळ वगरेजमा होऊन थोडा डिस्टर्बन्स असतो. तो काढून गाणं क्लीन करायचं, त्यातले म्युझिक पीस जास्त क्लीअर करायचे हे मोलाचं काम ते करतात. त्यामुळे जुनी गाणीसुद्धा खूप क्लीअर आणि उत्तम साउंड क्वालिटीमध्ये आपल्याला ऐकायला मिळू शकतात.
कमलेशजी लहान असताना त्यांचे वडील त्यांना रेडिओ सिलोन लावायला सांगायचे. ती फ्रीक्वेन्सी बरोबर मिळाल्याशिवाय रेडिओ स्टेशन स्पष्ट ऐकू येत नसे. गाण्यांची क्वालिटी आणि स्पष्टता यांच्या विषयीचे संस्कार तेव्हाच त्यांच्यावर झाले आणि पुढे गाण्यांच्या संग्रहाच्या त्यांच्या छंदामध्ये या संस्कारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कमलेशजींनी त्यांचं एक घर गाण्यांच्या संग्रहासाठीच ठेवलेलं आहे. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर ते 'संग्रह'वाल्या घरी जातात आणि उशिरापर्यंत गाण्यांच्या डिजिटलायझेशनचं, क्लीिनगचं काम करतात. ते सांगतात, 'यात माझी कला काही नाही. इतरांनी केलेलं काम लोकांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचावं एवढाच माझा उद्देश असतो. कार्यक्रमात कुठल्याही गाण्याला जो 'वन्स मोअर' मिळतो तो मला नसून त्या कलाकारालाच असतो!'
त्यांच्या या छंदाची सुरुवात २००४-०५ च्या सुमाराला झाली. कमलेशजींनी त्यांच्या इंजिनीअिरगच्या कामासाठी संगणक घेतला होता. त्या दरम्यान एकदा त्यांची बहीण पुण्याहून आली होती. तिने त्यांना मराठी गाणी संगणकावर लोड करून दिली. अशा पद्धतीने गाणी संगणकामध्ये लोड करता येतात हे कळल्यावर कमलेशजींसाठी एक नवीन दालनच खुलं झालं. त्यांना कॅसेट टेपरेकॉर्डर संगणकाला जोडून गाणी ट्रान्सफर करता येतात हेही समजलं आणि कमलेशजींनी त्यांच्या मित्रांना कॅसेटमधील गाण्यांच्या सीडी बनवून द्यायला सुरुवात केली. असं करता करता त्यांनी स्वत:चं कलेक्शन करायला सुरुवात केली, ती संगीतकार
ओ. पी. नय्यर यांच्या गाण्यांपासून!
ओ. पी. नय्यर ठाण्यात राहत असत. दूरचित्रवाहिनीवर ओ.पी. नय्यर यांच्या मृत्यूची बातमी पाहिल्यावर कमलेशजी लगेच तिकडे गेले. तिथे त्यांची ओळख रेडिओ सिलोनचे प्रसिद्ध निवेदक गोपाल शर्मा यांच्याशी झाली. त्यांच्या सोबतच आणखी एका व्यक्तीशी त्यांची ओळख झाली, ती व्यक्ती म्हणजे रेकॉर्ड कलेक्शनमध्ये अग्रणी असलेले प्रीतम मेघानी. त्यांनी गाण्यांच्या संग्रहाच्या बाबतीत कमलेशजींचा दृष्टिकोन बदलला. मेघानींच्या सांगण्यावरून फक्त ओ.पी. नय्यर यांची गाणी जमवण्याऐवजी ते इतरांचीही गाणी जमवायला लागले. मेघानींकडून त्यांना लता मंगेशकर यांच्या पाकिस्तानातून रेकॉर्ड करून आणलेल्या कॅन्सल्ड गाण्यांच्या कॅसेट मिळाल्या. प्रदीप आचार्य यांची ओळख झाली आणि चोर बाजारात मिळणाऱ्या रेकॉर्ड्सविषयी समजलं. मग चंदूभाई मोदी रेकॉर्डसवरून हव्या त्या गाण्यांच्या कॅसेट करून देतात हे कळलं. मधुकर सरपोतदार यांच्या मार्फत चंदूभाईंची ओळख झाली. सरपोतदारांनी त्यांचं कलेक्शन तर दिलंच पण चंदूभाई ज्याच्याकडून गाणी घेत त्या रफिकभाईंचीपण त्यांनी ओळख करून दिली आणि मग थेट रफिकभाईंकडूनच कमलेशजींना कॅसेट मिळायला लागल्या. आणखी एक संग्राहक मेहेरकाका (मुलुंड - ऑल इंडिया रेकॉर्डस कलेक्टर यांच्याकडून त्यांना नलिनी जयवंत यांनी गायलेल्या सत्तरेक रेकॉर्ड मिळाल्या. या रेकॉर्ड नलिनी जयवंत यांनी स्वत: मेहेरकाकांना दिल्या होत्या! त्याशिवाय कमलेशजींकडे संगीतकार हुस्नलाल भगतराम, अनिल विश्वास, वसंत देसाई, एस. एन. त्रिपाठी, एस.डी. बर्मन, चित्रगुप्त, हेमंत कुमार, शंकर-जयकिशन, सज्जाद हुसेन, शामसुंदर, हंसराज बेहेल, सी.अर्जुन, उषा खन्ना, बिपिन बाबुल, जी. एस. कोहली, बुलोसिरानी, मदन मोहन, ओ. पी. नय्यर, अविनाश व्यास, एन. दत्ता, सलील चौधरी, नौशाद, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर. डी. बर्मन आणि इतरही अनेक संगीतकारांचं कलेक्शन आहे. विशेष म्हणजे १९४८ मधलं 'हीर-रांझा' चित्रपटातलं खय्याम यांनी संगीत दिलेलं आणि त्यांनीच गीता दत्त यांच्या सोबत गायलेलं गाणं तर त्यांच्या संग्रहात आहेच. पण एस. एन. त्रिपाठी, ओ. पी. नय्यर, वसंत देसाई, अनिल विश्वास, मदनमोहन या संगीतकारांनी स्वत: गायलेली गाणीही त्यांच्याकडे आहेत. वेगवेगळ्या गायकांच्या आवाजातलं िहदी खासगी संगीत, मराठी नाटय़, भाव, चित्रपट, लोकसंगीत त्यांच्या संग्रहात आहे. मोहम्मद रफी यांची खासगी गाणी (जी गाणी चित्रपटांत नाहीत), शिवाय रफींनी संगीत दिलेली अत्यंत दुर्मीळ अशी चार गाणी त्यांच्या संग्रहात आहेत! 'स्वरसाज'चा एक अख्खा कार्यक्रम या गाण्यांवर झाला होता!
२००८ पर्यंत कमलेशजींकडे बरंच कलेक्शन झालं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं असं त्यांना प्रकर्षांने वाटायला लागलं. त्यामुळे २००९ च्या माघी गणेश जयंतीला त्यांनी जुनी गाणी ऐकवण्याचा पहिला कार्यक्रम ठाण्याच्या 'न्यू इंग्लिश स्कूल'मध्ये केला. या कार्यक्रमाला कमलेशजींनी आधी 'सूरसाज' असं नाव दिलं होतं पण गोपाल शर्मानी ते बदलून 'स्वरसाज' करावं असं सुचवलं आणि त्याच नावाने मग हे कार्यक्रम व्हायला लागले. वेगवेगळ्या विषयांवरची गाणी ऐकवत त्यांनी 'स्वरसाज'चे पन्नास कार्यक्रम केले. या कार्यक्रमाला रेडिओ सिलोनचे स्टार निवेदक गोपाल शर्मा, पद्मिनी परेरा, लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, ज्येष्ठ गायिका मधुबाला जव्हेरी, मुबारक बेगम, संगीतकार विनोद यांच्या दोन मुली अशा प्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली आहे. कार्यक्रम ऐकण्यासाठीही अगदी नाशिक-पुण्याहून रसिक ठाण्यात येत असत. फक्त हिंदीच नाही तर मराठी गाण्यांचेही तीन कार्यक्रम त्यांनी केले. गुढीपाडव्याला राम मराठे यांचे चिरंजीव संजय मराठे, पी. सावळाराम यांचे चिरंजीव संजय पाटील आणि प्रसिद्ध तबला वादक भाई गायतोंडे यांच्या उपस्थितीत मराठी कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. हे सर्व कार्यक्रम म्हणजे कमलेशजींचा 'वन मॅन शो' असे. हॉल बुक करण्यापासून गाण्यांची निवड, सादरीकरण ते स्पीकर्स उचलणं, चहा-पाण्याची व्यवस्था बघणं सगळं ते स्वत: करत असत. सुभाष कुलकर्णी, उदय मेहेंदळे, सत्यजित सराफ, विनायक वैद्य आणि आर. के. जोगळेकर यांनीही बरीच मदत केल्याचं कमलेशजींनी आवर्जून सांगितलं.
No comments:
Post a Comment