Saturday, August 19, 2017

Naturopathy techniques

‘आरोग्य जपणे हे आपले कर्तव्य आहे, परंतु फारच थोडय़ा लोकांना ‘शारीरिक संस्कृती’(physical culture) अशी काही गोष्ट असल्याचे भान असते.’ असे हर्बर्ट स्पेन्सर याने एके ठिकाणी म्हटले आहे. माहिती स्फोटाच्या या ज्ञानाधिष्ठित युगात असंख्य प्रतिबंधक उपाययोजना व उपचार पद्धती उपलब्ध असतानाही  स्पेन्सरचे हे म्हणणे आजही तितकेच खरे आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

मात्र कोणतीही उपचारपद्धती ही परिपूर्ण असावी अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. पण बहुतांश वेळा ती तशी नसते हेही तितकेच खरे. म्हणून उपचार करणाऱ्यांनी या स्वाभाविक मर्यादांचे भान बाळगणे आवश्यक असते. उपचारपद्धती कशी असावी त्याचे काही सर्वसामान्य निकष सोबत दिले आहेत. हे निकष लावले तर फारच थोडय़ा उपचारपद्धती परिपूर्णतेच्या जवळपास येताना दिसतात.

अशीच एक कमीत कमी खर्चिक व निसर्गाशी जास्तीतजास्त जवळीक साधणारी उपचारपद्धती म्हणजे निसर्गोपचार पद्धती! निसर्गोपचार म्हणजे निसर्गातील विविध घटकांचा उपयोग करून केलेला उपचार. या उपचारपद्धतीत, ज्यातूनच मानवी शरीराची निर्मितीही होते अशा पाच मूलभूत द्रव्यांचा म्हणजे माती, पाणी, वायू, अग्नी व आकाश यांचा उपयोग करण्यात येतो. (म्हणून या पद्धतीला ‘पंचमहाभूतात्मक पद्धती’ असेही म्हणतात.) निसर्गोपचारांत औषधे, गोळ्या वा इंजेक्शने यांचा वापर होत नसल्याने, त्यास ‘ड्रगलेस थेरपी’ असेही संबोधले जाते व आहाराव्यतिरिक्त बाकी सर्व उपचार ‘बाह्य’ असल्याने त्यात ‘बाह्य उपचारपद्धती’ असेही म्हटले जाते. किंबहुना मालिश, बाष्पस्नान, मातीलेप, लपेट इ. बाह्यउपचार हे निसर्गोपचारांचे एक शक्तीस्थान आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. रोग का निर्माण होतात, त्यांचे निवारण कसे करता येते, ते होऊ नयेत म्हणून काय करावे यासंबंधी निसर्गोपचारपद्धतीचे आपले असे काही सिद्धान्त आहेत. या विविध सिद्धान्तास अनुलक्षून निसर्गोपचारांची जी चार मूलतत्त्वे म्हणून सांगता येतील ती अशी-
नैसर्गिक आहार-विहार २. व्यायाम ३. मानसिक, बौद्धिक व भावनिक संतुलन ४) ईश्वरप्रणिधान.
या चार तत्त्वांवर आधारित अशा विविध उपचारपद्धती निसर्गोपचारशास्त्रात विकसित झाल्या. उदा. आहार, रसाहार, लंघन, जलोपचार, मृत्तिकोपचार, सूर्यस्नान, वायुस्नान, बाष्पस्नान, मालिश, लपेट इ. इ. यापैकी काहींची माहिती आपण या लेखांकात करून घेऊ.

* जलपान- ‘माणसाने पाणी किती प्यावे’ हा तसा वरवर साधासरळ, निर्धोक वाटणारा प्रश्न पण विविध शास्त्रांचे त्यावर एकमत नाही हे वास्तव आहे! निरोगी तरुण व्यक्तींनी आपापल्या प्रकृतीनुसार, ऋतुमानानुसार व दिवसाकाठी ६ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते.जेवणापूर्वी १/२ ते १ तास वा जेवणानंतर दोन तासांनी पाणी पिणे हितावह असते. निसर्गोपचारांत शुद्ध, स्वच्छ, ताजे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता प्यावे यावर भर असतो. (अर्थात असे पाणी शुद्ध नसल्यास ते योग्य रितीने गाळून व ठराविक मुदतीपर्यंत उकळून प्यावे असे आधुनिक वैद्यक व आयुर्वेदाचे मत आहे.) सकाळी उठल्यावर त्वरित शुद्ध जलपान करणे हा काही विकारांवर उत्तम उपचार असल्याचा सिद्धान्त आयुर्वेद (उष:पान) व काही जपानी तंत्रे (अ‍ॅक्वारोथेरपी) मांडतात. पण अर्थात याला ठोस पुराव्यांची आवश्यकता आहे असे नमूद करावेसे वाटते. हृदयविकार, किडनीचे विकार, सांध्याचे विकार असणाऱ्यांनी ‘जलपान’ तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे. अन्यथा लाभापेक्षा हानी होण्याचीच शक्यता जास्त. कमी पाणी पिण्याने जशी निर्जलीकरणाची (Dehudration) भीती तशीच अन्नपाणी पिण्याने रक्तपेशी फुटण्यापासून ते मेंदूदाह (Encephalopathy) होण्यापर्यंत दुष्परिणाम होऊ शकतात हे ध्यानात ठेवावे. सर्वसामान्य तरुण निरोगी व्यक्तीने पाणी किती प्यावे याबाबत विविध मतांच्या अमेरिकन सर्वेक्षणाचा एक निष्कर्ष याबाबतीत लक्षात ठेवण्यासारखा आहे व तो म्हणजे : ‘पाणी केव्हा प्यावे व किती प्यावे?- तहान लागल्यावर पाणी प्यावे व तहान भागेपर्यंत पाणी प्यावे!’ आता बोला!!
*  लपेट- सर्वाग अथवा शरीराचा काही भाग ओल्या, थंड कपडय़ात गुंडाळणे हा या पद्धतीतील एक महत्त्वाचा भाग. संबंध शरीराऐवजी छाती, ओटीपोट, जननेंद्रिये अथवा हातपाय येथेही लपेट देता येतो. विकारानुसार कोठे लपेट द्यावयाचा ते ठरविण्यात येते.
ल्ल  शेक- वेदनाशमनाच्या दृष्टीकोनातून दुखणाऱ्या भागावर गरम पाण्यात भिजविलेली पट्टी ठेवणे, खास उपकरणाने अशा भागावर वाफ सोडणे किंवा गरम पाण्याच्या पिशवीने अथवा बाटलीने शेकणे इ. प्रकारांचा यात वापर केला जातो.
*  पादस्नान- या प्रकारात आवश्यक एवढेच व शक्य तेवढे कमी कपडे घालून, शरीराभोवती घोंगडी गुंडाळून, खुर्चीवर बसून, दोन्ही पाय गरम पाण्याच्या बादलीत बुडविले जातात. डोक्यावर थंड पाण्यात भिजविलेला नॅपकिन ठेवला जातो. हा प्रयोग साधारण २० ते ३० मि. इतक्या कालावधीपर्यंतच केला जातो. या प्रयोगात रक्तदाब उतरण्याची शक्यता असल्याने गर्भारपणी, अतिउच्चरक्तदाब असणाऱ्यांनी व हृद्रोग्यांनी याचा वापर करू नये. पुढील लेखांकात आपण निसर्गोपचारांच्या आणखी काही तंत्रांची ओळख करून घेऊ. ही सर्व तंत्रे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच अवलंबावी ही सूचना कधीही विसरू नका. सध्याचे युग ‘गांधीगिरी’चे आहे. निसर्गोपचारांच्या बाबतीतही गांधीजी खूप आग्रही होते. मग का न डोकवावे उपचारांच्या गांधीगिरीत?                              

उपचारपद्धती कशी असावी?
* उपचारपद्धती बहुसंख्य व्याधी विकारांवर परिणामकारक असावी.
* उपचारपद्धती कमी खर्चिक, सर्वाना सहजपणे उपलब्ध व विशेष दुष्परिणाम नसणारी हवी.
* उपचारपद्धती केवळ रोगोपचारात्मक असू नये, तर ती रोगप्रतिबंधात्मक हवी.
* उपचारपद्धतीमध्ये संशोधनास व प्रगतीस वाव असावा.
* उपचारपद्धतीने स्वस्थ जगण्याची प्रणाली निर्माण करावी.

निसर्गोपचारांचा इतिहास
 निसर्गसंपन्न प्राचीन भारतामध्ये निसर्गोपचार मोठय़ा प्रमाणात प्रचलित होते असे दिसते. अथर्ववेद व आयुर्वेदात पंचमहाभूतांच्या शक्तीचे आरोग्यासाठी महत्त्व वर्णन केले आहे. ‘औषधं जान्हवी तोयं’ (गंगाजल हे औषधासारखे आहे), ‘लंघनं परम् औषधम्, (लंघन हे सर्वश्रेष्ठ औषध आहे), ‘वैद्य नारायणो हरी’ (सूर्य हा वैद्य आहे) यासारख्या वचनांनी अथवा स्वास्थ्यवृत्ताच्या विविध संकल्पनांनी ही गोष्ट स्पष्ट होते.
पाश्चात्य देशांतही या तत्त्वांचा विकास अधिक मजबूत पायावर झाला व म्हणून निसर्गोपचारांची अनेक तंत्रे आज पाश्चात्य देशांतून आपल्याकडे येताना दिसतात. आधुनिक वैद्यकाचाही जनक मानला गेलेला हिपोक्रेटस (सुमारे २५०० वर्षांपूर्वी), जर्मनीतील विन्सेन्ट प्रिन्सनीझ (इ. स. १८२६), झेकोस्लोव्हाकियातील डॉ. जोहानीस स्कॉथ (इ. स. १८४६), बव्हेरियातील फादर सॅबेस्टियन नीप, ऑस्ट्रियाचे बारनोल्ड स्किली, अमेरिकन डॉ. जेम्स जॅक्सन, डॉ. बेनेडिक्ट कस्ट व डॉ. अ‍ॅन विग्मोर ही पाश्चात्यांतील काही दिग्गज निसर्गोपचारक मंडळी. निसर्गोपचार एक शास्त्र म्हणून विकसित करण्यात या मंडळींनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे.

सिद्धान्त व मूलतत्त्वे
*  रोगांच्या उद्भवाचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरात जहरी व विजातीय घटकांचा वा द्रव्यांचा संचय होणे, अनेक प्रकारचे रोग तसेच काही अंशी वृद्धावस्था’ ही या घटकांमुळे होते. (आधुनिक वैद्यकातील Free Radicalsl व  Endogenous Taxinsl यांच्याशी मिळती-जुळती अशी संकल्पना?)
* तीव्र व शीघ्रविपाकी रोग (Alute Illness) म्हणजे नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीची अभिव्यक्ती होय. (आधुनिक वैद्यक विचारपद्धतीशी ही थोडीशी विसंगत अशी संकल्पना आहे. व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी पडल्यास रोगाची लक्षणे अधिक तीव्र असे आधुनिक वैद्यक मानते.)
* शरीरात विजातीय घटकांचा संचय हे कारण व जीवाणू वा विषाणूंची वृद्धी हा त्याचा परिणाम आहे. (आधुनिक वैद्यक याच्याबरोबर उलट असा सिद्धान्त मांडते.)
* प्रकृती रोगनिवारण करते, औषधे वा चिकित्सक रोगनिवारण करत नाहीत. (आधुनिक वैद्यकातही प्रकृतीपोषक औषधांवर (PROHOST Therapy) मोठय़ा प्रमाणात संशोधन चालू आहे!)

‘उदंड जाहले पाणी। स्नान-संध्या करावया।।’ समर्थ रामदासांनी या ओळींतून जणू स्नानाचे व त्याकरिता आवश्यक असणाऱ्या पाण्याचे महत्त्वच एक प्रकारे अधोरेखित केले आहे. संपूर्ण शरीराच्या बाह्य स्वच्छतेकरिता अंघोळीसारखे दुसरे साधन नाही; पण ती कशी करावी याचेही एक शास्त्र आहे. केवळ ४ ते ५ मि.ची कावळ्याची अंघोळ (Executive Bath) ही किमान १५-२० मि.च्या शास्त्रशुद्ध पूर्ण अंघोळीला पर्याय ठरूच शकत नाही व निसर्गोपचारांमधील अंघोळ असेल तर तिची ‘स्टाइल’ आणखीनच वेगळी!
सूर्यस्नान, वायुस्नान, बाष्पस्नान, कटिस्नान, पादस्नान अशा स्नानाच्या वेगवेगळ्या पद्धती निसर्गोपचारात वापरल्या जातात. त्यांचा आपण एक धावता आढावा आता घेणार आहोत.

सूर्यस्नान : ‘अतिपरिचयात अवज्ञा’ या न्यायाने भरपूर सूर्यप्रकाशाच्या आपल्या देशात आपल्याला सूर्यप्रकाशाचे महत्त्व अजिबात लक्षात येत नाही; पण युरोप-अमेरिकेमधील अनेक भागांत दिवस लहान होऊ लागताच कमी सूर्यप्रकाशाचे परिणाम दृगोच्चर होऊ लागतात. माणसे निराश, दु:खी, चिडचिडी व मुडी होऊ लागतात, त्यांची भूक कमी होते व निद्रानाश जडतो. वसंत ऋतू येताच परत सर्व काही ठिकठाक होते. हे असे का होते याबद्दल अनेक सिद्धान्त मांडले गेले आहेत. त्यातील एका प्रमाणे, सूर्यप्रकाशामुळे शरीरांतर्गत स्रवणाऱ्या ‘मेलॅटोनीन’ नावाच्या द्रव्याचे प्रमाण कमी होते तर सूर्यप्रकाशाच्या अभावी ‘मेलॅटोनीन’ अतिप्रमाणात तयार होते व त्यामुळे नैराश्य येते. हा सर्व प्रकार १९७० च्या आसपास पाश्चिमात्य शास्त्रज्ञांच्या लक्षात आला, त्याला त्यांनी SAD (Seasonal affcctive disarder) असे नाव दिले. आश्चर्य म्हणजे इ. स. पूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला चरक सूर्यप्रकाशाचा उपचारांमध्ये वापर करताना दिसतो! विविध कारणांमुळे सूर्यप्रकाश उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. मात्र हे उगवतीच्या सूर्यप्रकाशाबाबतच खरे आहे. दुपारची वा माध्यान्हीची उन्हे त्वचेला व शरीराला घातक असतात. हे पक्के ध्यानात ठेवावे. सूर्यप्रकाशातील अतीनील किरणांमुळे शरीरात ‘डी’ जीवनसत्व निर्माण होते तर अधोरक्त  किरणांमुळे उष्णता निर्माण होऊन स्नायू शिथिल होतात. निसर्गोपचारपद्धती असे मानते, की या कारणामुळे सूज व वेदना कमी होतात. नियमित सूर्यस्नानामुळे सर्वसामान्य आरोग्य तर सुधारतेच; पण शरीराची प्रतिरक्षाप्रणालीही अधिक कार्यक्षम होते. निसर्गोपचार शास्त्रानुसार सूर्यप्रकाशामुळे केसांची वाढ अधिक होते, रक्तदाब कमी होतो, शरीरातील आम्लता कमी होते व स्नायूंची ताकद वाढते. मात्र सूर्यस्नान घेताना काही पथ्ये पाळणे आवश्यक. ते सकाळी व संध्याकाळी कोवळ्या उन्हातच करावे. शरीर निर्वस्त्र अथवा कमीतकमी कपडय़ात असावे, डोळे झाकलेले व डोळे बंद असावेत आणि सूर्यस्नानानंतर थंड पाण्याने अंघोळ करावी.

वायुस्नान : शुद्ध व शीतल हवेत खोल, दीर्घ श्वास काही काळापर्यंत घेणे म्हणजे वायुस्नान! या शास्त्राप्रमाणे रक्ताचे ऑक्सिजनेशन सुधारणे व शरीर-मन शिथिल होणे असे अनेक फायदे फायदे वायुस्नानामुळे होतात. (यातील ऑक्सिजनेशनचा मुद्दा आधुनिक विज्ञानानुसार विवादास्पद असला तरी दीर्घश्वसनामुळे मानसिक शिथिलीकरणास मदत होते एवढे नक्की!)

बाष्पस्नान : घामावाटे शरीरातील विजातीय द्रव्ये बाहेर टाकली जातात. उपचारांनी अधिक घाम निर्माण केल्यास शरीरातील साठलेली विषद्रव्ये अधिक प्रमाणात बाहेर टाकली जातील, असा गृहीत सिद्धांत या उपचारांमागे आहे. या उपचारांकरिता एक विशिष्ट प्रकारच्या बाष्पपेटीची आवश्यकता असते. रिकाम्यापोटी एखादा ग्लास पाणी पिऊन कमीत कमी कपडय़ांवर या पेटीत बसतात. याचा कालावधी साधारण १२ ते १५ मि. असतो. बाष्पस्नानानंतर शरीर थंड व ओल्या कपडय़ाने पुसावे व नंतर गार पाण्याने अंघोळ करावी. बाष्पस्नान आठवडय़ातून साधारण एकदा घेतले जाते. फिनलंडमध्ये (व आता सर्व जगात!) प्रचलित असलेला ‘सोना बाथ’ हा बाष्पस्नानाचाच एक बदललेला प्रकार म्हणता येईल. गर्भवती स्त्रिया, हृदरोगी व रक्तदाबाचे रोगी यांनी बाष्पस्नान वा सोना बाथ टाळणे इष्ट. स्थूलत्त्वनिवारणाकरिताही अशा प्रकारचे स्नान हा एक उत्तम पूरक उपाय आहे. असे मानले जाते.

कटिस्नान : पोट व आतडे, यकृत, प्लीहा, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांचे कार्य सुधारण्याकरिता या पद्धतीचा वापर निसर्गोपचारात केला जातो. कटिस्नानाकरिता साधारण २।। ते ३ फूट लांब व सुमारे दोन फूट रुंद, असा टब लागतो. टबात ८ ते १० इंच उंचीपर्यंत येईल, अशा पद्धतीने गार वा समशीलतोष्ण पाणी भरून त्यात शरीराचा मध्यभाग पाण्यात बुडेल, अशा रीतीने बसतात. पाण्यात बसण्यापूर्वी एक ग्लास गरम पाणी पिणे हितावह असते. हिवाळ्यात साधारणत: १० ते १५ मि. व उन्हाळ्यात २० ते ३० मि. इतका वेळ कटिस्नान घेतले जाते. कटिस्नानानंतर पोट कोरडे करून पोटाचे व्यायाम घेणे इष्ट असते. कटिस्नान रिकाम्या पोटाने घ्यावे व नंतरही अर्धा तास रिकामे ठेवावे.

मृत्तिकास्नान : निसर्गोपचारातील ही मृत्तिकोपचारांची पद्धत म. गांधींमुळे लोकप्रिय झाली असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. संपूर्ण शरीरावर अथवा शरीराच्या एखाद्या भागावर ओल्या मातीचा लेप, पट्टी, पोटीस अथवा डोके बाहेर ठेवून शरीर मातीत पुरून ठेवणे इ. प्रकारांनी मृत्तिकोपचार केले जातात. या शास्त्रानुसार ओल्या मातीमुळे शरीरातील ‘अधिक’ उष्णता शोषली जाणे, शरीरात साठवलेली विषारी द्रव्ये खेचली जाणे, स्नायू व चेतातंतूंवरील ताण शोषला जाणे इ. प्रकारांनी सूज, वेदना इ. नाहीशा होतात. यावर अधिक शास्त्रशुद्ध प्रयोग होऊन त्यापाठीमागचे शास्त्र शोधणे आवश्यक आहे असे वाटते. मृत्तिकोपचारांकरिता स्वच्छ, रासायनिक वा अन्य प्रदूषणांपासून मुक्त अशी मऊ माती लागते. सर्वसाधारणपणे मातीचा एक इंच जाडीचा लेप देण्यात येतो. ताप, मलावरोध काही विशिष्ट कारण नसलेली पोटदुखी वा सांधेदुखी यासारख्या विकारांवर मृत्तिकोपचार उपयुक्त असल्याचे दिसून येते. आयुर्वेदाने आरोग्यपूर्ण जगण्याचे शास्त्र सांगताना (स्वास्थ्यवृत्त) निसर्गाच्या तालांशी जुळवून घेण्यास, तसेच उपचारांमध्ये नैसर्गिक साधनांचा व प्रक्रियांचा समावेश केला आहे. निसर्गाशी समतोल राखू पाहणाऱ्या ‘योगा’चा आयुर्वेदाचा व निसर्गोपचारांचा म्हणूनच अनेक ठिकाणी संबंध येताना दिसतो. जलनेती व वमन हे उपचार असेच Common Ground वर आहेत.

जलनेती व वमन : नाकावाटे पाणी आत घेऊन ते तोंडावाटे बाहेर काढणे व एका नाकपुडीतून घेऊन ते दुसऱ्या नाकपुडीने बाहेर काढणे म्हणजे जलनेती. सकाळच्या वेळी रिकाम्यापोटी अधिक प्रमाणात पाणी पिऊन ते ओकून बाहेर काढणे वमन. या दोन्ही ‘यौगिक’ शुद्धिक्रियांचा वापर हा श्वसनमार्ग, सायनसेस आणि पोट साफ ठेवण्याकरिता अनुक्रमे केला जातो. डोकेदुखी, नाक चोंदणे, सर्दी, सायनुसायटिस अशा विकारांवर जलनेतीचा चांगला उपयोग होताना दिसतो. तर पचनाच्या विकारांमध्ये वमनाचा चांगला उपयोग होताना दिसतो. अर्थातच पाण्याचा वापर करून केलेल्या या दोन्ही शुद्धिक्रिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच कराव्या. निसर्गोपचारातील दोन महत्त्वाच्या पद्धती म्हणजे आहार आणि चुंबक चिकित्सा. अर्थात ते स्वतंत्र लेखविषय आहेत. त्याविषयी पुढे केव्हातरी. विविध उपचारपद्धतींमध्ये निसर्गोपचारांचे आपले स्वत:चे असे एक स्थान आहे. कमी खर्चिक व निसर्गाच्या अधिक जवळ नेणाऱ्या या पद्धतीतचे म्हणूनच अधिक महत्त्व आहे. आधुनिक संशोधनाने त्यातील महत्त्वाच्या व मूलभूत सिद्धांतांना पुष्टी मिळाल्यास अधिक बरे होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरवर सोपे वाटणारे हे उपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत न पेक्षा रोगांपेक्षा उपचार अधिक धोकादायक, अशी परिस्थिती निश्चितच उद्भवेल!

naturopathy
naturopathy meaning
naturopathy books
naturopathy treatment
naturopathy benefits
naturopathy for weight loss
naturopathy courses
naturopathy bangalore
naturopathy diet

naturopathy benefits
naturopathy benefits and disadvantages
benefits of naturopathy for diabetes
naturopathic cures
side effects of naturopathy
naturopathy techniques
cost of naturopathy
benefits of seeing a naturopath
benefits of naturopathy in hindi

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...