Saturday, November 15, 2014

अॅक्चुरिअल सायन्समधल्या संधी


विमा क्षेत्रात मोठे बदल घडतायत. यामध्ये करिअरचेही अनेक नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातलाच एक म्हणजे 'अॅक्चुरी' विमा कंपनीचे प्रॉडक्ट बाजारात आणणे आणि पुढील गुंतवणूक करणे हे काम 'अॅक्चुरी' करतात. या नव्या करिअर संधीविषयी...

एखादी व्यक्ती नोकरीला लागली, की तिच्या बचतीची सुरुवात विमा घेण्यापासून होते. विमा घेतला, की प्रीमियम भरण्याची जबाबदारी येते. प्रीमियमची रक्कम प्रत्येक पॉलिसीनुसार बदलत जाते. ही रक्कम ठरवण्याची महत्त्वाची जबाबदारी 'अॅक्चुरी'वर असते. विमा कंपनीचे एखादे नवे उत्पादन बाजारात आणणे, त्याचा प्रीमियम ठरवणे, जमा झालेली रक्कम योग्य प्रकारे पुन्हा बाजारात गुंतवणे या कामांसाठी प्रत्येक विमा कंपनीमध्ये अॅक्चुरी काम करतात.

विमा क्षेत्रामध्ये अनेक मोठे बदल होत आहेत. अनेक नव्या कंपन्या नव्या उत्पादनांसह बाजारात येत आहेत. तेव्हा अॅक्चुरिअल सायन्समध्ये करिअर करण्यास चांगलाच वाव आहे. जनरल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, लाइफ इन्शुरन्स या तिन्ही विभागांमध्ये अॅक्चुरीचे काम अत्यावश्यक आणि अत्यंत महत्त्वाचे असते.

कामाचे स्वरूप

पारंपरिकरित्या पाहायचे झाले, तर अॅक्चुरी काही वर्षांपर्यंत फक्त लाइफ इन्शुरन्समध्येच काम करत होते. पॉलिसीच्या प्रीमियमची रक्कम ठरवणे ही त्याची मुख्य जबाबदारी. काही ठराविक कालावधीनंतर ग्राहकाला पॉलिसीची रक्कम परत द्यावी लागते. मध्यंतरीच्या काळामध्ये क्लेम झाल्यास ग्राहकाला रक्कम द्यावी लागते. यासाठी प्रीमियमची रक्कम काळजीपूर्वक ठरवावी लागते. ही रक्कम ठरवताना बाजारातील चढ-उतार, नागरिकांचे सरासरी आयुष्यमान याचा अभ्यास अॅक्चुरीला करावा लागतो.

पुन्हा गुंतवणूक

जो प्रीमियम कंपनीमध्ये जमा होतो, त्यातली रक्कम पुन्हा गुंतवण्याची मुख्य जबाबदारी अॅक्चुरीवर असते. विमा कंपनीला होणाऱ्या नफ्यामधील काही टक्के रक्कम ग्राहकांना बोनस म्हणून द्यावी लागते. या नफ्याला अॅक्चुरिअल सरप्लस, असे म्हणतात. हा बोनस किती द्यायचा, कंपनीला नफा किती झाला, हे ठरवण्याचे काम अॅक्चुरीला पार पाडावे लागते.

संधी

पूर्वी अॅक्चुरीज जनरल इन्शुरन्समध्ये काम करत नव्हते; पण कोणतीही नवी पॉलिसी बाजारामध्ये आणताना 'इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी' (इर्डा) या संस्थेची परवानगी लागते. तेव्हा पॉलिसीचे नियम, प्रीमियम ठरवताना अॅक्चुरीची मदत घेतली जाते. पॉलिसी सुरू करण्यापूर्वी 'इर्डा'ला अॅक्चुरीचे 'प्रीमियम वर्क आउट सटिर्फिकेट' आवश्यक असते.

काही वेळा क्लेम सेटलमेंटसाठी काही अवधी जातो. वर्ष संपताना त्यासाठी आवश्यक ती तरतूद करावी लागते. अशा वेळी आयबीएनआर (इन्कर्ड बट रिफंडेड) तरतुदीसाठी अॅक्चुरीकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते.

भविष्यात पेन्शन क्षेत्र मुक्त झाल्यावर पेन्शनच्या तरतुदींसाठी अॅसेट अँड लायबिलिटीचे व्हॅल्युएशन करावे लागेल. त्यासाठी अॅक्चुरीची गरज लागणार आहे.

एखादा कर्मचारी पाच वर्षे नोकरी करत असेल, तर त्याला ग्रॅच्युइटी द्यावी लागते. त्यासाठी कंपनी पहिल्या वर्षापासूनच ग्रॅच्युइटीसाठीचा खर्च बाजूला ठेवायला लागते. सध्या प्रत्येक कंपनीला हा खर्च बाजूला ठेवणे अत्यावश्यक आहे.

कंपनीने एखादी ग्रॅच्युइटी पॉलिसी घेतली नसेल, तर कंपनी रिटायरमेंट बेनिफिट्सच्या व्हॅल्युएशनसाठी अॅक्चुरीचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे.

नवा ट्रेंड

अनेक वेळा कंपनी विक्री केलेल्या मालाला 'फ्री वॉरंटी' देते. प्रत्येक वर्षामध्ये काही वस्तूंची रिप्लेसमेंट करावी लागते. सर्वसाधारण कंपनीला किती रिप्लेसमेंट द्याव्या लागतात, याचे गणित केले जाते. सध्या त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद केली जाते. त्या खर्चाचे व्हॅल्युएशन केले जाते. त्यानंतर ती तरतूद इन्कम टॅक्स ऑफिसरकडून मान्य केली जावी, यासाठी लागणारे सटिर्फिकेट अॅक्चुरीकडून घेतले जाते.
acturial-science
पात्रता

अॅक्चुरी होण्यासाठी तुम्ही किमान बारावी उत्तीर्ण असायला हवे. ज्यांनी गणित किंवा गणिताशी संबंधित विषय घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे, असे विद्यार्थीही अॅक्चुरी होण्यासाठी प्रयत्न करू शकतात. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्चुरिज ऑफ इंडिया या संस्थेचे सदस्यत्व घेणे गरजेचे आहे. या संस्थेची प्रवेश परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या १५ विषयांच्या परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. या संस्थेचा ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधील अॅक्चुरिअल इन्स्टिट्यूटशी सामंजस्य करार आहे. त्यामुळे तुम्ही भारतामध्ये परीक्षा उत्तीर्ण झाला असाल, तर तुम्ही ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्येही अॅक्चुरी म्हणून काम करू शकता. या संदर्भातील अधिक माहिती http://www.actuariesindia.org या वेबसाइटवर आहे.

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...