मानवी कॅलक्युलेटर
मित्रांनो, दिवाळीची सुटी संपून आता शाळा सुरू झाली असेल. खूप दिवसांनंतर शाळेत जायला मजा येतेय ना! पण पुन्हा काही नावडते विषय शिकावे लागतील म्हणून कंटाळाही येत असेल. गणित या नावडत्या विषयांमध्ये आघाडीवर असेल. आकडेमोड करण्याचा कंटाळा, हे त्याचं एक महत्त्वाचं कारण. पण आपल्याच भारतातील एका मित्राने सर्वात वेगवान आकडेमोड करत जगभरातील विद्यार्थ्यांना मागे सारून बक्षीस मिळवलं आहे.
'जर्मनी मेंटल कॅलक्युलेशन वर्ल्डकप २०१४' चं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. त्यात १३ वर्षाच्या ग्रंथ ठक्करने जगभरातील सर्व स्पर्धकांच्या वेगावर मात करत मनातल्या मनात आकडेमोड करून सर्वात वेगाने गणितं सोडवून दाखवली. बरं ही गणितंही छोटी-मोठी नव्हती. थेट आठ आकडी संख्यांचा गुणाकार, मोठमोठ्या संख्यांचं वर्गमूळ काढणं यांसारखी गणितं त्यांना तोंडी सोडवायची होती. या स्पर्धेत त्याने २० आकडी संख्यांचा गुणाकार केवळ ४ मिनटं, ४४ सेकंदात पूर्ण केला. ६ आकडी संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी त्याला ६७ सेकंद, तर ८ आकडी संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी केवळ २०० सेकंद लागले. यासाठी कॅल्युलेटर तर सोडाच, साधं कागद-पेन्सिल वापरण्याचीही परवानगी नव्हती. त्याच्या या कामगिरीमुळे परीक्षकही चक्रावून गेले आहेत. १८ देशातील ४० हून अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते. या स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक १० वर्षांचा, तर सर्वात मोठा ८० वर्षांचा होता. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते. आता २०१६ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या 'मेंटल कॅलक्युलेशन अँड मेमरी स्पोर्ट ऑलिम्पिक'मध्ये तो सहभागी होणार आहे. त्यासाठी त्याचा सर्व खर्च जर्मन सरकार करणार आहे.
गुजरातमधील वापी या छोट्याशा गावात ग्रंथ राहतो. यापूर्वी तुर्कस्तानमध्ये झालेल्या गणित ऑलिंपियाडमध्येही फ्लॅश अंझान या खेळात त्याने लहानग्यांच्या गटात सुवर्ण, तर मोठ्यांच्या गटात रजत पदक मिळवलं होतं. यामध्ये मोठ्या स्क्रीनवर अगदी सेकंदभरासाठी दिसणाऱ्या १५ नंबरांची बेरीज करायची असते. मात्र गणितात एवढी गती असूनही त्याला गणिती व्हायचं नाही, तर अंतराळशास्त्रज्ञ व्हायचं आहे. अर्थात तिथेही गणिताचा उपयोग होणारच! त्याच्यावर शॉर्टफिल्म बनविण्यासाठी जपानच्या सरकारी टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी वापीमध्ये येऊन गेले.
No comments:
Post a Comment