सध्याचा काळ संगीतक्षेत्रासाठी भरारीचा मानला जातो. अनेक नवनवीन प्रयोग हल्ली संगीतक्षेत्रात होताना दिसत आहेत. अनेक नवीन संगीकारांचा उगम होताना दिसत आहे. हल्ली रेकॉर्डिंगचं नवीन तंत्र विकसित होत आहे. तसंच नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संगीतात प्रयोग केलेले दिसत आहेत. या नवनवीन प्रयोगांना रसिक प्रेक्षकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद लाभताना दिसतोय. तंत्रज्ञान हे संगीतक्षेत्राला लाभलेलं वरदान आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. संगीतक्षेत्रातील तंत्रज्ञान भरारीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
म्युझिक प्रोग्रॅमिंग :
म्युझिक प्रोग्रॅमिंग म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये असलेले साउन्डस मिडी(midi) की-बोर्डच्या साहाय्याने वाजवून ऱ्हीदम आणि मेलडीचे नवनवीन ट्रॅक्स तयार करणे. यात अद्भुत साउन्डसची अनोखी दुनियाच आपल्यापुढे येते. संगीतकाराला आणि प्रोग्रॅमर्सना यात अनेक नवनवीन प्रयोग करता येतात. एका क्लिकवर आज अनेक गोष्टी सहज शक्य होतात. प्रोग्रॅमिंगच प्रमुख वैशिष्ट म्हणजे केवळ कीबोर्ड आणि संगणकाच्या साहाय्याने एखाद्या गाण्याचं संगीत तयार करता येत.
काही प्रोग्रॅमिंग सोफ्टवेअर
- लॉजिक प्रो, - Logic pro
- एफ एल स्टुडीओ, L L Studio
- क्यूबेस Qbase
तानपुरा, पेटी मोबाइल अॅप्स
सध्याच्या धावपळीच्या युगात गायकांनाही निवांतपणे संगीतसाधना करता येत नाही. रियाझ, कार्यक्रम या सगळ्यात त्यांची प्रचंड धावपळ होते. या धकाधकीत दरवेळी कार्यक्रमाला तानपुरा घेऊन जाणं शक्य होत नाही. त्यामुळे बरेचसे गायक आयपॅडवर किंवा मोबाइलवर तानपुरा लावून रियाझ करताना दिसतात. तसंच अनेकदा कार्यक्रमांमध्येही याचा वापर होताना दिसतो. याचा एक फायदा असा की चटकन आपल्याला सूर समजतो आणि महत्वाची गोष्ट अशी की कोणताही सूर यामुळे आपल्याला प्ले करता येतो. याचप्रमाणे तबल्याच्या रियाझासाठीदेखील काही प्रसिद्ध अॅप्स आहेत.
- लेहरा बॉक्स Lehara Box
- सुरशाला Sushala
- तानपुरा प्रो Tanpura Pro
लॅपटॉपने पेपर बचत
अनेकदा वादकांना वाजवताना नोटेशनची गरज भासते. की-बोर्ड वादक, गिटार वादक नोटेशन रेफर करण्यासाठी लॅपटॉपचा वापर करताना दिसतात. यामुळे पेपरची बचत तर होतेच; पण त्याचबरोबर काम करणंही तितकंच सोपं होतं.
गाणं रंगे आयपॅड संगे
गायकांना अनेकदा गाण्याच्या लिरिक्सची आवश्यकता असते. अशावेळी डायरी किंवा कागदावर गाण्याचे बोल लिहून ठेवल्यास ते चटकन मिळतील, याची शक्यता कमी असते. म्हणूनच टॅबलेट किंवा आयपॅडचा वापर गायकमंडळी करतात.
मोबाइल रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर Mobile recording software
अनेकदा कलाकार काही सुंदर रचना तयार करतात; पण रेकॉर्डिंगची सोय नसल्याने त्याचं पुढे काहीच होत नाही. तसंच गायक कार्यक्रमामध्ये गाणी खूप छान सादर करतात; पण ती सुद्धा दरवेळी प्रेक्षकांना मिळत नाहीत. यासाठीच मोबइल रेकोर्डिंग अॅप्स आहेत, जे नवनिर्मितीला पटकन साठवून ठेवण्याची सोय करतात. या रेकॉर्ड्समध्ये अतिशय उत्तम असं दर्जाचं रेकॉर्डिंग करण्याची सोय असते.
इंटरनेटचा प्रभावी वापर
हल्ली संगीतक्षेत्रात इंटरनेटचा प्रभावी वापर होताना दिसत आहे. अशा अनेक साइट्स आहेत, जिथे गाण्याच्या नोटेशन्स उपलब्ध आहेत. यामुळे कलाकारांना डायऱ्या, वह्या ठेवण्याचा त्रास वाचतो आणि हवं ते गाणं हवं त्यावेळेला सहज मिळतं. याशिवाय इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला गाण्यांचे म्युझिक ट्रॅक्ससुद्धा मिळतात.
गाण्याला व्हिज्युअल्सची जोड
हल्ली प्रेक्षकाना नुसत गाणं ऐकायला आवडत नाही, त्यामुळे काहीतरी वेगळं करावं लागतं. याचसाठी हल्ली गाण्यांना व्हिज्युअल्सची जोड दिली जाते. व्हिज्युअल्समुळे गाण्यातील भाव अधिक चांगल्या प्रकारे सांगितले जातात, असं अनेक लोकांच मत आहे. त्यामुळे लोकांना एक अनोखी नयनरम्य मेजवानी मिळते. सध्या रंग नवा, आमची गाणी या कार्यक्रमांमध्ये या प्रकारचे व्हिज्युअल्स वापरले जातात.
ट्रॅकवर गाणं
संगीतात हल्ली नवा ट्रेंड आलेला आहे. प्रोग्रॅमिंगच्या साहाय्याने गाण्याचे ट्रॅक तयार करून त्यावर गाणं सादर केलं जातं. यामुळे एक असा फायदा होतो की कार्यक्रमाचा खर्च कमी होतो आणि गायकाला आपल्या गाण्याला वाव देण्याची संधी मिळते. चालीवर गाणं वरवर जरी सोपं वाटत असलं, तरी तेही तितकंच आव्हानात्मक काम आहे. इथे गायकाला सांभाळून घ्यायला वादक नसतात, त्यामुळे एका अर्थाने गायकाची परीक्षा असतेच.
या सगळ्या गोष्टींबरोबरच हल्ली रेकॉर्डिंग टेक्निकमध्ये बदल झालेला आहे. अनेक उत्तम सॉफ्टवेअर्स आणि तंत्रज्ञ यांच्यामुळे संपूर्ण संगीतक्षेत्रात खूप बदल घडून येत आहेत. यात आनंदाची बाब ही की म्युझिक टेक्नॉलॉजी या विषयात संशोधन आणि अभ्यास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
टेक्नॉलॉजी खरोखरच वरदान!
मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटत की टेक्नॉलॉजी हे संगीतक्षेत्राला लाभलेलं वरदान आहे. केवळ तंत्रज्ञानामुळे आज संगीतकारांना वेगवेगळे प्रयोग करणं शक्य होत आहे. हल्लीच्या यंग जनरेशनला पटकन आवडेल अशी म्युझिक अरेंजमेट करणं प्रोग्रॅमिंगमुळे शक्य होतं. हल्लीच्या फास्ट जमान्यात कोणावरही अवलंबून न राहता जर काम वेळेत पूर्ण करायचं असेल, तर या गोष्टींची खूपच मदत होते. हल्ली जगात पटापट अपग्रेडेशन्स होत असतात, त्यामुळे स्वतःला जगाबरोबर अपग्रेडेड ठेवायचं असेल, तर त्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे; पण त्याचबरोबर संगीताच मूळ स्वरूपही जपलं गेलं पाहिजे.
No comments:
Post a Comment