Saturday, November 15, 2014

‘गेट’चा गेटवे कसा असतो?

मी 'मटा'मधील प्रश्नोत्तरे मुद्दाम वाचतो. मी बारावी सायन्सला ९५ टक्के मिळवून मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला नंतर फर्स्ट इयर बीईला ८१ टक्के मिळवले आहेत. मला एमटेक करायची इच्छा आहे. मी 'गेट'चा अभ्यासपण सुरू केला आहे. मात्र, 'एमटेक'च्या अभ्यासक्रमाबद्दल मला नीटशी माहिती नाही. 'गेट'चा अभ्यास व पुढचे शिक्षण याविषयी मला माहिती द्यावी.

- रोहन पाटील

उत्कृष्ट वाटचालीबद्दल अभिनंदन. ती अशीच सुरू ठेवावीस म्हणून शुभेच्छा पण. प्रथम 'गेट'बद्दल थोडेसे. त्यातील तांत्रिक बाबी आपण बाजूला ठेवूया. मुख्य म्हणजे दहावी ते बीईदरम्यानच्या अभ्यासावर आधारित कोणताही प्रश्न 'गेट'मध्ये असू शकतो. त्याला तोंड देण्यासाठीची तयारी तू सुरू केली आहेसच. ती नियमितपणे सुरू ठेवणे महत्त्वाचे. म्हणजेच दर आठवड्याला फारतर दोन ते तीन तास या पद्धतीत जर केवळ 'गेट'साठी तुला देता आले, काढता आले, तर यश नक्की मिळू शकते. इंजिनीअरिंगमधले डिस्टिंक्शन टिकवून हे सोपे नाही. 'गेट'साठी सातव्या से‌मिस्टरला पहिला प्रयत्न व गरज पडल्यास नंतरचे प्रयत्न हा रस्ता योग्य राहील. गरज वाटल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन क्लासेसमध्ये मिळू शकते, तेही घ्यावेस. तुझे टार्गेट ९९ पर्सेंटाइलचेच हवे.

'एमटेक'ला विषय निवडीबद्दल काही बोलणे वा सांगणे आता योग्य नाही. प्रत्येक 'आयआयटी'त विषयांचे वैविध्य आहे. त्याखेरीज इलेक्टिव्ह विषयसुद्धा बदलतात. येत्या तीन वर्षांत तुझ्या विषयांच्या आवडीनुसार व त्यातील गतीनुसार तो निर्णय तू घ्यावास, एवढेच इथे नमूद करतो. मात्र, एका वेगळ्या गोष्टीची नोंद करतो. भारतीय मेकॅनिकल इंडस्ट्रीला एमटेक व्यक्तींची कायमच कमतरता जाणवत आली आहे, सध्या तर ती प्रकर्षाने वाढत आहे.

मी नांदेडमध्ये एमएस्सी मायक्रोबायोलॉजी करीत आहे. पास झाल्यावर नोकरी मिळण्यासाठी मी काय करावे?

- सचिन देवकाते

तुझ्या प्रश्नाचे उत्तर अजिबातच सोपे नाही. ते अनेक बाबींवर अवलंबून मात्र आहे. तुझी दहावीपासूनची मार्कलिस्ट हा एक घटक. मायक्रोबायोलॉजीच्या अभ्यासाद्वारे व्यवहारातील सामान्य बाबींबद्दलचे तुझे अवांतर वाचन हा दुसरा; पण महत्त्वाचा घटक. पगाराची अपेक्षा हा तिसरा व सर्वांत महत्त्वाचा घटक. म्हणजे मायक्रोबायोलॉजीची निवड तू का केली आहेस, याबद्दल विस्ताराने तू स्वतः काही बोलू शकतोस काय, हा! शेवटचा घटक व त्याचे उत्तर देणारे विद्यार्थी नक्की नोकऱ्यांमध्ये सामावले जातात. मोजक्यांना चांगल्या नोकऱ्याही मिळतात.

No comments:

Post a Comment

The Benefits of Drinking Lemon Water: A Comprehensive Guide

  The Benefits of Drinking Lemon Water: A Comprehensive Guide Lemon water has become a popular health trend, and for good reason. This simpl...