Saturday, November 15, 2014

खा चिप्स कुरूकुरू

काही वर्षांपूर्वी बटाटा वेफर्स किंवा केळीच्या कापांपासून बनणारे वेफर्स यांच्या पलीकडे चिप्सची दुनिया नव्हती. पण गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांनी ५ ते १० रुपयांची चिप्सची पाकिटे बाजारात आणून त्यांचा एक वेगळा ग्राहकवर्ग निर्माण केलेला आहे.

आज खाद्यपदार्थांच्या जवळपास प्रत्येक दुकानात चिप्सचे असे विविध प्रकार हमखास पाहायला मिळतात. विशेषतः आजकाल 'हॉट चिप्स' या नावाने स्वतंत्रपणे दुकाने उघडलेलीही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यात नळ्यांच्या, जाळीदार, ओबडधोबड, लांब, जाड, पातळ अशा विविधरूपी चिप्सची उपलब्धता लक्षात घेता, त्याबद्दलचे आकर्षण नक्कीच वाढले आहे, असे म्हणता येईल.

बटाट्याचे किंवा केळ्याचे पिवळ्या रंगांचे चिप्स हे आता तसे नवीन राहिलेले नाहीत. बटाट्याचे वेफर्स म्हणजे उपवासासाठी हमखास खाल्ला जाणारा पदार्थ. वाढदिवस असला, घरात एखादी छोटीशी पार्टी असली किंवा अगदी मुलांसोबत फिल्मला जाताना टाइमपास म्हणून हे वेफर्स हमखास असत. घरात काम करता करता सहज तोंडात टाकण्यासाठी वेफर्सचा उपयोग सर्वज्ञात आहे. केळ्याच्या वेफर्सची चवही आता आपल्या जिभेवर रुळलेली आहे. त्यामुळे या नेहमीच्या चिप्सपेक्षा हटके असे चिप्स बनविण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यात मग कारले, आले, पुदिना, पालक यांचा समावेश होऊ लागला आहे.

पुदिना पालकचा झणका

पुदिना, पालक यांच्यापासून बनणारे चिप्स सध्या लोकप्रिय आहेत. केळ्याचा गोळा बनवून त्यात पुदिना, पालक, गवार यांचे मिश्रण एकजीव करून नंतर ते अव्हनमध्ये तापवतात आणि कडक झालेल्या या मिश्रणाच्या किसणीवर बारीक चकत्या पाडल्या जातात. त्यावर मद्रासचा विशेष तिखट, चटपटीत मसाला टाकला जातो. हे पदार्थ बनविणारे कारागीर हे प्रामुख्याने दक्षिण भारतातील किंवा तामिळनाडू, केरळातील असतात.

जिंजर, कारले चिप्स

लोकांच्या आवडीचा आणखी एक चिप्सचा प्रकार म्हणजे जिंजर चिप्स. भोपळा आणि केळ्यापासून तयार केलेल्या गोळ्यात आलं, मद्रासी मसाला व चाट मसाला टाकून नंतर अव्हनमध्ये हा गोळा कडक करून त्याच्या चकत्या पाडल्या जातात. या सगळ्या चिप्सपैकी आणखी एका चिप्सला मागणी आहे ती म्हणजे कारल्यापासून बनलेल्या तिखट वेफर्सना. मधुमेह होऊ नये म्हणून आजकाल कारल्याचा वापर आहारात वाढला आहे. या चिप्सला त्यामुळेच मागणी असते.

फणसाचे चिप्स

फणसाचे गरे सुकवून त्यापासून तयार केलेले चिप्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. आता हे चिप्स सगळीकडेच उपलब्ध असतात.

तेलाकडे लक्ष

दादरच्या 'हॉट चिप्स'चे पप्पू ठाकूर हे गेली अनेक वर्षे या चिप्सचा व्यवसाय करीत आहेत. सध्या तेलकट पदार्थ खाण्यावर बरेच निर्बंध आल्यामुळे हे चिप्स बनवताना त्यात कमीत कमी तेल असेल याची काळजी घेतली जाते, असे ते सांगतात. चिप्स डिप फ्राय केले जात असल्यामुळे त्यात तेलाचा अंश अधिक असतो, पण तळून झाल्यानंतर मशिनच्या सहाय्याने त्यातील तेल काढले जाते आणि तेलाचा कमी अंश ठेवला जातो, असे ठाकूर नमूद करतात. केळ्याचे वेफर तर त्यातील अस्सल खोबरेल तेलाची चव राहावी, यासाठी मंगलोरहून मागविले जातात, असे ठाकूर सांगतात.

आकारही अनेक

लहान मुलं या चिप्सकडे विशेष आकर्षित होत असल्याने वेगवेगळ्या आकारात चिप्स उपलब्ध असतात. कधी नळ्यांच्या आकारात तर कधी जाळीदार फ्रायम्सच्या रूपात. त्यात तिखट व बिना-तिखटाचे असे प्रकार असतात. पौष्टिक चिप्सचाही समावेश आहे. चकलीच्या प्रकारात नाचणी, मका यांच्यापासून बनलेल्या चकलीचे तुकडे विकले जातात. त्याला जोड मिळाली आहे ती शेजवान, टोमॅटो, सोया, मंचुरिअन या निरनिराळ्या चवीच्या चकल्यांची. गोड आणि तिखट केळ्याच्या, लांब व गोल आकाराच्या केळ्याच्या चिप्सलाही चांगली मागणी असते. मुलांसाठी खास टमटम नावाच्या गाठिया वेगवेगळ्या डाळींपासून बनवतात. त्यात मूग, मसूर, चणा, उडीद यांचा समावेश असतो. पुदिनापासून बनलेली खास गाठियाही असते. चीज पापडी, साधी पापडी, शेवेचे वेगवेगळे चटकदार प्रकारही खवय्यांचे आधार असतात. साबुदाणा, तांदूळ, गहू, केळी, भोपळा, नाचणी यापासून बनलेल्या चिप्स नेहमीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे.

No comments:

Post a Comment

The Benefits of Drinking Lemon Water: A Comprehensive Guide

  The Benefits of Drinking Lemon Water: A Comprehensive Guide Lemon water has become a popular health trend, and for good reason. This simpl...