Saturday, November 15, 2014

सोन्याची मागणी वाढली

जगभरात सोन्याची मागणी दोन टक्क्यांनी कमी झाली असली तरी, भारतात मात्र ती अधिकाधिक वाढत आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी तब्बल ३९ टक्क्यांनी म्हणजेच २२५.१ टनांनी वाढली! गेल्यावर्षी याच काळात ही मागणी १६१ टन इतकी होती. या तिमाहीत सोन्याच्या दागिन्यांची मागणी ६० टक्क्यांनी वाढून ती १८२.९ टनावर गेली. गेल्या वर्षी याच तीन महिन्यांत ती ११४.५ टन इतकी होती.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने तिसऱ्या तिमाहीतील सोन्याच्या मागणी-पुरवठ्याचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला. 'सोन्याचे भाव कमी झाले वा वाढले तरी भारतीयांच्या सोनेखरेदीवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे भारतात सोन्याची मागणी कायमच राहणार', असे मत वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (इंडिया)चे एमडी सोमसुंदरम यांनी 'मटा'कडे व्यक्त केले.

वित्तीय तसेच, चालू खात्यावरील तूट नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने सोने आयातीवर घातलेले निर्बंध कायम ठेवले आहेत. सोने व्यापाऱ्यांकडून सातत्याने मागणी होऊनही सरकारने अजून आयात शुल्क कमी केलेले नाही. तसेच, आयातीसंदर्भातील ८०ः२० टक्क्यांनी अटही कायम ठेवली आहे. या अटकावांचा कोणताही परिणाम सोन्याची मागणी होण्यात झालेला नसल्याचे सोमसुंदरम यांनी सांगितले.

दसरा-दिवाळी नेहमीप्रमाणे सोनेखरेदी वाढतेच, यंदाही हाच ट्रेंड राहिलेला दिसला. दिवाळीत वनटाइम बोनस मिळतो, त्यातून ग्राहक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात, हा अनुभव आहे. भारतीय ग्राहकांच्या या मानसिकतेत बदल होण्याची शक्यता नसल्याने सोन्याला मागणी राहणारच, असे सोमसुंदरम यांनी म्हणाले.

मागणी ८५०-९५० टनांची राहील

संपूर्ण वर्षभरात सोन्याची मागणी ८५०-९५० टनांची राहील, असा अंदाज अहवालात मांडण्यात आला आहे. चौथ्या तिमाहीत सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या जगभर सोन्याचे भाव उतरले असल्यानेही ग्राहक सोनेखरेदीकडे अधिकाधिक वळू लागले आहेत. गेल्या वर्षभरात ८२५ टन सोने आयात झाले होते. त्यात तस्करीद्वारे आलेल्या सोन्याचाही समावेश आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जगात मागणी ओसरली

तिसऱ्या तिमाहीत जगभरात सोन्याची मागणी दोन टक्क्यांनी ओसरली आहे. सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहक न वळल्याने मागणी कमी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात मागणी ९५२.८ टन होती, ती ९२९ टनावर आली. मंदीतून बाहेर पडत असलेल्या अमेरिका, ब्रिटन या देशांमधून दागिन्यांची मागणी हळूहळू वाढू लागली आहे. मात्र, चीनमधूनही सोन्याच्या दागिन्यांची मागणी ३९ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसते.

No comments:

Post a Comment

Mental Health Awareness in India

Mental Health Awareness in India Mental health is an essential aspect of overall well-being, but it remains a sensitive and often sti...