दोन देशांची सीमा असो की दोन शेतांची. ही सीमा दर्शवण्यासाठी कुंपणाचा वापर करण्यात येतो. या काटेरी कुंपणाच्या साहाय्याने एका बाजूकडून दुसरीकडे जाणं रोखता येणं शक्य झालं. हे काटेरी कुंपण देश, शेत एकमेकांपासून विलग करत असतानाच, लाकूड आणि तारांच्या मदतीने सुरू झालेली कुंपणाची ही परंपरा बदलत काटेरी कुंपणाची निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्याने मात्र लाखो डॉलर्स कमावले.
विविध कामांसाठी कुंपणांचा वापर वर्षानुवर्षांपासून केला जात आहे. मग लाकडाच्या फळ्या लावून असो की दगडांच्या राशी रचून. पण आधुनिक काळात तारांचं जे काटेरी कुंपण आपल्याला पाहायला मिळतं, ती देणगी आहे एका अमेरिकन शेतकऱ्याची. १८१३ मध्ये न्यू-यॉर्कमधील क्लॅरेनडॉन येथे जन्मलेले जोसेफ ग्लिडन, १८४३ साली लग्नानंतर आपल्या पत्नीसह इलियॉनिस येथे स्थलांतरित झाले. ग्लिडन दाम्पत्याने शेती खरेदी करुन त्याची मशागत सुरू केली. आपल्या कामात नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करणाऱ्या ग्लिडनला इलियॉनिसमध्ये एक यात्रा सुरू असल्याचं कळलं. तिथे अनेक कृषिपयोगी गोष्टीही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. तेथे त्याने लाकडी कुंपण पाहिलं. या लाकडी कुंपणाला ठरावीक अंतरावर लाकडाच्या उभ्या फळ्या होत्या आणि त्याला खिळे ठोकण्यात आले होते. पण लाकडाच्या वापरामुळे त्याची किंमत मात्र अधिक होती. त्याआधी शेतीला कुंपण घालण्यासाठी तारांचा वापर केला जात असे. या साध्या तारांनाच खिळे लावले तर ते अधिक परिणामकारक होतील, असं ग्लिडनला वाटलं. असं कुंपण घातलं तर पीकांची चोरी आणि प्राण्यांकडून शेतीची होणारी हानीही रोखता येईल, असा विचार ग्लिडनने केला. त्याने दोन तारा एकमेकांवर गुंफत असताना त्यात ठरावीक अंतरावर छोटे छोटे खिळे अडकवले. दोन्ही तारांना पीळ दिल्याने त्यांत खिळे अगदी घट्ट बसले. हे कुंपण लावल्यानंतर ग्लिडनने तत्काळ त्याचं पेटंट मिळवलं. १८७४ मध्ये बार्बड वायर या नावाने हे पेटंट देण्यात आलं. या कुंपणाचं व्यावसायिक उत्पादन घ्यायला ग्लिडनने सुरूवात केली आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. पीकचोरी, नासधूस मोठ्या प्रमाणवार घटली. पुढे पहिल्या महायुध्दातही या काटेरी कुंपणाचा वापर करण्यात आला. शत्रूची चढाई रोखण्याकरता अशा कुंपणाचं जाळं रचलं जात असे. ज्यामुळे रात्रीच्या वेळी चढाई करणाऱ्या सैनिकांपुढे अडचण निर्माण होत असे. नाझी राजवटीमध्ये ज्यू नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या छळछावण्यांमधून कोणी पळून जाऊ नये यासाठी अशाप्रकारच्या काटेरी कुंपणामध्ये विद्युतप्रवाह सोडला जात असे. आज, संपूर्ण जगात ग्लिडनने तयार केलेल्या कुंपणाचीच रचना वापरण्यात येते. एका छोट्याशा निरीक्षणामुळे ग्लिडनने या कुंपणाची निर्मिती केली आणि त्याच्यामुळेच तो कोट्यधीशही झाला.
No comments:
Post a Comment